वॉशिंग्टन,
Sensor-equipped Smart Football अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या फिफा विश्वचषक 2026 साठी यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असा अधिकृत फुटबॉल वापरण्यात येणार आहे. यामुळे खेळ अधिक वेगवान, अचूक आणि तांत्रिकदृष्ट्या पारदर्शक होणार असल्याचे मानले जात आहे. नव्या फुटबॉलमध्ये प्रगत सेन्सर्स आणि हलका मोशन ट्रॅकिंग चिप बसवण्यात आला असून तो सामना सुरू असताना प्रत्येक स्पर्श, हालचाल आणि दिशेतील बदल रिअल-टाइममध्ये नोंदवेल. या डेटाच्या आधारे पंचांना त्वरित आणि अचूक निर्णय घेण्यास मदत होणार आहे.

या स्मार्ट फुटबॉलला सामन्यापूर्वी चार्ज करावे लागणार असून त्याची बॅटरी सुमारे सहा तास टिकणार आहे. स्टेडियममधील १२ कॅमेऱ्यांच्या समन्वयाने हा फुटबॉल थेट VAR प्रणालीशी जोडलेला असेल, ज्यामुळे ऑफसाइड आणि गोल-लाइन निर्णय अधिक जलद आणि अचूकपणे देता येतील. फुटबॉलच्या आत ५०० हर्ट्झ क्षमतेचा मोशन सेन्सर चिप बसवण्यात आला आहे, जो प्रति सेकंद ५०० वेळा डेटा रेकॉर्ड करतो. ॲडिडासने विकसित केलेला हा चिप केवळ १४ ग्रॅम वजनाचा असून तो फुटबॉलच्या संतुलनावर कोणताही परिणाम करत नाही. त्यामुळे खेळाडूंना फुटबॉलच्या नैसर्गिक हालचालीत कोणताही फरक जाणवणार नाही. फुटबॉलमध्ये यापूर्वीही तांत्रिक फुटबॉलचा वापर करण्यात आला असला तरी, या नव्या स्मार्ट फुटबॉलमुळे खेळात तंत्रज्ञानाचा वापर अधिक व्यापक आणि प्रभावी होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.