भावूक प्रसंग; सिलंबम गुरूंचा मोदींसमोर साष्टांग नमस्कार video

    दिनांक :25-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Silambam Guru Performs Prostration राष्ट्रपती भवनात झालेल्या पद्मश्री पुरस्कार सोहळ्यात एक अत्यंत भावनिक आणि लक्षवेधी क्षण पाहायला मिळाला. पारंपरिक तमिळ युद्धकला सिलंबमचे ज्येष्ठ गुरू के. पझानीवेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर साष्टांग नमस्कार करत आपला आदर व्यक्त केला. या प्रसंगाने संपूर्ण सभागृह काही क्षणांसाठी भावुक झाले. पंतप्रधान मोदी यांनीही तत्काळ आसनावरून उठत पझानिवेल यांचा हात हातात घेत त्यांचे अभिवादन स्वीकारले. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 
 

mofi 
सिलंबम या ५००० वर्षे जुन्या पारंपरिक युद्धकलेचे जतन, त्याचे प्रशिक्षण आणि त्याला आधुनिक स्पर्धात्मक खेळाच्या स्वरूपात विकसित करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. या कलेला जागतिक पातळीवर पोहोचवण्यातही त्यांचा मोठा वाटा मानला जातो. के. पझानिवेल हे मूळचे पुदुचेरी येथील पुराननकुप्पम गावचे रहिवासी आहेत. गरिबी आणि संघर्षावर मात करत त्यांनी लहान वयापासूनच सिलंबम या कलेला आपले जीवन समर्पित केले. शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी बस क्लिनरपासून सुरुवात करत पुढे बस चालक म्हणूनही काम केले, मात्र नंतर संपूर्ण आयुष्य मार्शल आर्ट्ससाठी वाहून घेतले.
 
 
 
आज ते अनेक विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो विद्यार्थी तयार झाले असून, अनेकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही यश मिळवले आहे. त्यांनी २०२२ मध्ये आपल्या गावात ‘मामल्लन सिलंबम क्लब’ सुरू करून आर्थिकदृष्ट्या दुर्बळ विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षणाची व्यवस्था केली. दुबई, पॅरिससह अनेक देशांमध्ये त्यांनी सिलंबमचे प्रात्यक्षिक सादर करत या प्राचीन भारतीय कलेला जागतिक ओळख मिळवून दिली आहे. शिस्त, आत्मसंरक्षण आणि सांस्कृतिक वारसा जपणारी ही कला आज त्यांच्या प्रयत्नांमुळे नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे.