भोपाळ,
Supreme Court's on Twisha Case भोपाळमधील चर्चित ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणाची सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी मध्य प्रदेश सरकारच्या वतीने बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी भावूक होत महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. 'मृत मुलीपेक्षा घटस्फोटित मुलगी बरी,' असे म्हणत त्यांनी ट्विशाच्या कुटुंबाने मुलीच्या तक्रारींना वेळेत गांभीर्याने घेतले नाही, अशी नाराजी व्यक्त केली. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पंचौली यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. आरोपी पक्षाच्या वतीने ज्येष्ठ वकील सिद्धार्थ दवे यांनी युक्तिवाद केला, तर पीडित कुटुंबासाठी ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा उपस्थित होते.
सुनावणीदरम्यान तुषार मेहता यांनी ट्विशाच्या सासू आणि माजी जिल्हा न्यायाधीश गिरीबाला सिंह यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सांगितले की, गिरीबाला सिंह विविध टीव्ही चॅनल्सवर मुलाखती देत असून आपल्या सुनेविरोधात वक्तव्य करत आहेत. तसेच तपास यंत्रणांना सहकार्य करण्यास त्या तयार नसल्याचा आरोपही त्यांनी केला.यावर आरोपी पक्षाचे वकील सिद्धार्थ दवे यांनी माध्यमांमध्ये प्रकरणाची माहिती प्रसिद्ध होत असल्याबद्दल आक्षेप घेतला. त्यांनी दावा केला की, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६४ अंतर्गत नोंदवलेले जबाबही वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. त्यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी न्यायालय कोणत्याही प्रकारचा एकतर्फी कथानक तयार होऊ देणार नाही, असे स्पष्ट केले. तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्याने पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचेही त्यांनी नमूद केले.
माध्यमांनाही जबाबदारीने वृत्तांकन करण्याचे आदेश
न्यायालयाने माध्यमांनाही संयमाने आणि जबाबदारीने वृत्तांकन करण्याचे आवाहन केले. संबंधित पक्षांचे नातेवाईक किंवा मित्र यांच्या आधारे निष्कर्ष काढू नयेत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.दरम्यान, पीडित कुटुंबाचे वकील सिद्धार्थ लुथरा यांनी एफआयआर दाखल करण्यात तीन दिवसांचा विलंब झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. पुरावे जपण्यातही निष्काळजीपणा झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच गिरीबाला सिंह स्वतःचे कॉल डेटा रेकॉर्ड सादर करत असल्याबद्दलही त्यांनी आक्षेप घेतला. सरकारी वकील तुषार मेहता यांनी न्यायालयाला माहिती दिली की, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिल्ली एम्सच्या तज्ज्ञ पथकाने रविवारी ट्विशा शर्माचे दुसरे शवविच्छेदन केले आहे. या प्रकरणातील तपास आणि सुनावणीकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.