वाशीम,
Swadeshi Jagran Manch news राष्ट्रहित, स्वदेशी विचारसरणी आणि आत्मनिर्भर भारत संकल्पनेला बळकटी देण्यासाठी सर्वांनी स्वदेशी वस्तूंचा वापर व स्थानिक बाजारपेठेतून खरेदी करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन कश्मीरीलाल भाईजी यांनी केले. स्वदेशी जागरण मंचाच्या वतीने आज केमिस्ट भवन, वाशिम येथे विशेष विचारवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास स्वदेशी जागरण मंचाचे अखिल भारतीय संयोजक कश्मीरीलाल भाईजी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी विदर्भ संयोजक शिवाजी भालतिलक तसेच विदर्भ प्रचारक पूर्णकालिक योगेश पटोकार यांचीही प्रमुख उपस्थिती होती. आपण जर आपल्या प्रतिष्ठानांमध्ये स्वदेशी वस्तू विक्रीवर भर दिला आणि नागरिकांनी स्थानिक बाजारपेठेतून खरेदी केली, तर शहराचा आर्थिक विकास होऊन आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत मोठे योगदान मिळेल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी अनेक भारतीय कंपन्यांची नावे विदेशी वाटत असली तरी त्या पूर्णतः भारतीय असल्याचे स्पष्ट करत, अशा स्वदेशी उद्योगांचा समाजामध्ये प्रचार-प्रसार होणे आवश्यक असल्याचे नमूद केले. तसेच स्वदेशी जागरण मंच लवकरच स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन देणारे ऑनलाईन अॅप सर्वांसाठी उपलब्ध करून देणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांनी पुढे येत भारतीय ब्रँडचा प्रचार करावा, भारतीय उद्योगांना बळ द्यावे व स्वदेशी चळवळ जनसामान्यांपर्यंत पोहोचवावी, असेही यावेळी बोलतांना कश्मीरीलाल भाईजी म्हणाले.
यावेळी पश्चिम विदर्भ संघटक आनंद गडेकर, अकोला-वाशीम विभाग संयोजक प्रसन्न वालचाळे, जिल्हा संयोजक मयूर चुंबळकर, जिल्हा सहसंयोजक शेखर फुंडकर, शहर संयोजक विपुल अग्रवाल, जिल्हा प्रशिक्षक मंगेश गवळी, संपर्क प्रमुख अनिल गुनागे यांच्यासह व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आशिष ठाकूर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नगर कार्यवाह दीपक जहागीरदार, सचिन करवा, मनीष तोष्णीवाल, सोनार असोसिएशन अध्यक्ष नितीन विसपुते, बजरंग दल प्रमुख मुकेश ठाकूर, राजेश जहागीरदार, दुर्गा वाहिनी प्रमुख अनिता काकडे, अॅड. सुरेश टेकाळे, डॉ. घुडे, माधव जहागीरदार, पवन शर्मा, माळोदे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर विचारवर्गास मोठ्या संख्येने व्यापारी, युवक व नागरिक उपस्थित राहून स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचा संदेश समाजात पोहोचविण्याचा संकल्प केला. सोबतच स्वदेशी वस्तू ची सूची सुद्धा सर्वांना वितरीत करण्यात आली.