मुंबई
Swayambhu movie अभिनेता निखिल सिद्धार्थ याच्या आगामी ‘स्वयंभू’ या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, चित्रपटाच्या भव्य निर्मितीमुळे तो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. चित्रपटाचा टीझर आणि पहिले गाणे ‘रा रा धीवरा’ प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी, प्रभावी दृश्यरचना आणि दमदार ॲक्शनमुळे ‘स्वयंभू’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षांचे केंद्र बनला आहे.
सत्य घटनांपासून प्रेरित असलेल्या या चित्रपटाची कथा सेंगोलच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाभोवती फिरते. भारताच्या गौरवशाली वारशाचे दर्शन घडवणाऱ्या या चित्रपटातून इतिहास, शौर्य आणि धर्माचा महाकाव्यात्मक प्रवास मांडण्यात येणार आहे. प्रदर्शित झालेल्या टीझरला १८ दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून, ‘रा रा धीवरा’ या गाण्यालाही यूट्यूबवर १३ दशलक्षांपेक्षा जास्त प्रेक्षकांनी पसंती दिली आहे.
दरम्यान, चित्रपटाच्या Swayambhu movie निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक खास बिहाइंड-द-सीन्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये निखिल सिद्धार्थ आणि प्रसिद्ध छायाचित्र दिग्दर्शक केके सेंथिल कुमार हे व्हीएफएक्स स्टुडिओला भेट देताना दिसत आहेत. पोस्ट-प्रॉडक्शनच्या प्रक्रियेदरम्यान ते कलाकारांशी चर्चा करताना, विविध दृश्यांचे परीक्षण करताना आणि संपूर्ण सर्जनशील कामकाजावर लक्ष ठेवताना पाहायला मिळतात.निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटासाठी ७५० हून अधिक सीजी कलाकार दिवस-रात्र मेहनत घेत असून, तब्बल २७०० पेक्षा अधिक व्हीएफएक्स शॉट्सवर काम सुरू आहे. प्रेक्षकांना सर्वोत्तम दर्जाचा अनुभव देण्यासाठी चित्रपटातील प्रत्येक दृश्य अत्यंत बारकाईने तयार केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. ‘स्वयंभू’ हा केवळ चित्रपट नसून एक भव्य सिनेमॅटिक अनुभव असेल, असा विश्वासही निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन भरत कृष्णमाचारी यांनी केले असून, संगीताची जबाबदारी ‘केजीएफ’ आणि ‘सालार’साठी प्रसिद्ध असलेल्या रवि बसरूर यांनी सांभाळली आहे. ‘बाहुबली’ आणि ‘आरआरआर’सारख्या चित्रपटांमधील नेत्रदीपक छायांकनासाठी ओळखले जाणारे केके सेंथिल कुमार यांनी चित्रपटाचे दृश्यवैभव साकारले आहे. तसेच ‘बाहुबली’चे संपादक तम्मीराजू यांनी संकलनाची जबाबदारी स्वीकारली आहे.
तब्बल १७० दिवस चाललेल्या चित्रीकरणामुळे ‘स्वयंभू’ हा अलीकडील काळातील सर्वात महत्त्वाकांक्षी चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. पिक्सेल स्टुडिओजचे निर्माते भुवन आणि श्रीकर यांच्या निर्मितीत साकारत असलेल्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांना भव्य दृश्यानुभवाची अपेक्षा आहे.