कोलकाता,
The Abhishek Banerjee Case पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या निवासस्थानी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यांच्या घराजवळ अचानक पोलिसांची उपस्थिती वाढल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोलकाता महापालिकेकडून (KMC) बेकायदेशीर बांधकामांशी संबंधित अनेक मालमत्तांवर नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या कारवाईचा संबंध अभिषेक बॅनर्जी यांच्या नावावर किंवा सहमालकीच्या असल्याचा आरोप असलेल्या सुमारे १७ मालमत्तांशी जोडला जात आहे.

या मालमत्तांमध्ये कोलकात्यातील कालीघाट परिसरातील तसेच हरीश मुखर्जी रोडवरील निवासस्थानांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. काही ठिकाणी नोटिसा थेट भिंतींवर चिकटवण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर संबंधित परिसरात पोलिसांची हालचाल वाढली असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.दरम्यान, अभिषेक बॅनर्जी यांनी कोलकाता महापालिकेला पत्र लिहून या नोटिसांना उत्तर देण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितल्याचेही समोर आले आहे. मात्र त्यांच्या निवासस्थानी पोलिसांच्या भेटीचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेले नाही. या संपूर्ण घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.