टिप्परच्या धडकेत दोन ठार : एक महिला गंभीर
पुसद,
Tipper Accident येथून जवळच असलेल्या इंदिरानगर येथील डम्पिंग ग्राऊंडजवळ चालकाने टिप्पर भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून दोन दुचाकीस्वारांना उडविले. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली. ही दुर्दैवी घटना सोमवार, 25 मे रोजी सकाळी 7.30 च्या दरम्यान घडली. अपघातामुळे काही वेळेसाठी वाहतुकीची कोंडी झाली होती. टिप्पर चालकाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. भरधाव टिप्परच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
अरविंद प्रल्हाद राठोड (वय 40, कोठारी, ता. महागाव) व गणेश विष्णू जाधव (वय 29, काटखेडा) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अनिता अरविंद राठोड (वय 35, कोठारी) या गंभीर जखमी झाल्या आहेत. शहर पोलिसांनुसार, अरविंद व त्यांची पत्नी अनिता हे दोघेजण दुचाकीने पुसदहून काटखेडाकडे जात होते. तेव्हा गणेशदेखील त्याच्या दुचाकीने त्याच्या गावी काटखेडा येथे जात होता. गणेश होमगार्ड असून तो पुसदला फुलसिंग नाईक महाविद्यालयात प्रशिक्षणासाठी आला होता.
Tipper Accident अशातच टिप्परचालक भारत शंकर पवार (वय 28, काटखेडा) याने रिकामे टिप्पर भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवीत दोन्हीही दुचाकींना जोरदार धडक दिली. या धडकेत अरविंद व गणेशचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर शहर पोलिस ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमी अनिता अरविंद राठोड यांना प्राथमिक उपचाराकरिता पुसद उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातातील टिप्पर पोलिसांनी जप्त केले.