चांदूर रेल्वे,
Truck plunges into Chandrabhaga River तालुक्यातील घुईखेड जवळ सोमवारी नागपूर - छत्रपती संभाजी नगर हायवेवर घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. या घटनेनंतर श्रद्धा आणि आश्चर्य यांची एकच चर्चा सुरू झाली आहे. चंद्रभागा नदीवरील पुलाचा कठडा तोडून एक भरधाव ट्रक थेट नदीपात्रात कोसळला. या घटनेत चालकाला साधे खरचटलेही नाही! विशेष म्हणजे हा अपघात ज्या ठिकाणी घडला, त्या नदीपात्र परिसरातच श्री संत बेंडोजी महाराज यांच्या संजीवन समाधीच्या पादुकांची आषाढी एकादशीला आरती केली जाते. त्यामुळे अनेक भाविक या घटनेकडे दैवी चमत्कार म्हणून पाहत आहेत. माहितीनुसार, ट्रक पुलावरून खाली पडताना सुमारे ३० ते ३५ फूट खोल नदीपात्रात कोसळला. अपघात इतका भीषण होता की, ट्रकचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. पुलाचा कठडा तुटून ट्रक थेट खाली आदळल्याने घटनास्थळी काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र या भीषण दुर्घटनेत सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे ट्रक चालक पूर्णपणे बचावला.
एवढ्या मोठ्या अपघातात चालकाला साधे खरचटले सुद्धा नाही. त्याने उपस्थित नागरिक आणि ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले. अपघातानंतर स्वतः चालकानेही माझा जीव वाचला, तो फक्त श्री संत बेंडोजी महाराजांच्या कृपेनेच अशी भावना व्यक्त केली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक, भाविक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. अनेकांनी या घटनेला चमत्कारिक बचाव असे संबोधले. श्री संत बेंडोजी महाराजांच्या संजीवन समाधी स्थळाबद्दल परिसरात मोठी श्रद्धा असून, या ठिकाणी अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे या अपघातानंतर भक्तांमध्ये अधिक श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. पुलाच्या सुरक्षिततेबाबतही आता प्रश्न उपस्थित होत असून, संबंधित विभागाने पुलाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.