उन्नाव,
6 killed as bus overturns in Unnao उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण रस्ते अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून सुमारे १९ जण गंभीर जखमी झाले आहेत. दिल्लीहून गोरखपूरकडे जाणारी दुमजली स्लीपर बस आग्रा-लखनौ द्रुतगती मार्गावर दीपवाल गावाजवळ अचानक अनियंत्रित होऊन उलटल्याने ही दुर्घटना घडली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेली बस प्रथम डिव्हायडरवर चढली आणि त्यानंतर पुलाला जोरदार धडक देऊन पलटी झाली. या भीषण अपघातामुळे परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. बस पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून अनेक प्रवासी आत अडकले होते. अपघातानंतर एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी काही तासांच्या प्रयत्नांनंतर वाहतूक सुरळीत केली. मृतांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू आहे.

दरम्यान, या दुर्घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने मदत आणि बचावकार्य वेगाने करण्याचे आदेश दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. जखमींवर योग्य उपचार केले जात असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. याच एक्सप्रेसवेवर सोमवारीही आणखी एक अपघात झाला होता, ज्यात ट्रकची धडक होऊन चालक आणि सहायकाचा मृत्यू झाला होता. सतत घडणाऱ्या अपघातांमुळे या मार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.