अफगाणिस्तानचा भारत दौऱ्यासाठी संघ जाहीर!

    दिनांक :26-May-2026
Total Views |
काबुल
Afghanistan Squad Announced अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) भारत दौऱ्यासाठी आपला कसोटी आणि एकदिवसीय संघ जाहीर केला आहे. जून महिन्यात अफगाणिस्तान संघ भारताविरुद्ध तीन एकदिवसीय सामने आणि एक कसोटी सामना खेळणार आहे. या दौऱ्यात हशमतुल्ला शाहिदी यांच्याकडे दोन्ही फॉरमॅटमध्ये संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. या दौऱ्याची सुरुवात 6 जून रोजी होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्याने होणार असून हा सामना न्यू चंदीगडमधील मुल्लानपूर स्टेडियमवर खेळला जाईल. त्यानंतर मर्यादित षटकांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे.
 
 

संघ जाहीर
 
दरम्यान, अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज रशीद खान कसोटी संघाचा भाग नसणार आहे. तो व्हाईट-बॉल क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित करत असल्याने कसोटी सामन्यातून त्याने माघार घेतली आहे. मात्र एकदिवसीय मालिकेत तो संघात सहभागी होणार असल्याची माहिती आहे. त्याच्या अनुपस्थितीत शराफुद्दीन अश्रफ आणि कैस अहमद यांच्यावर फिरकी गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे.
 
 
कसोटी संघासाठी निवड समितीने काही नवे चेहरे समाविष्ट केले असून अब्दुल मलिक, रहमानुल्लाह झद्रान आणि शराफुद्दीन अश्रफ यांना संधी देण्यात आली आहे. अनुभवी रहमत शाह आणि रहमानुल्लाह गुरबाज यांचे स्थान कायम ठेवण्यात आले आहे. यष्टीरक्षक म्हणून इक्रम अलीखिल आणि अफसर झझाई यांचा समावेश करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाजी विभागात नांग्याल खरोटाई, बिलाल सामी, झिया शरीफी आणि सलीम साफी यांसारख्या युवा खेळाडूंवर विश्वास दाखवण्यात आला आहे. या दौऱ्यासाठी राखीव खेळाडूंचीही घोषणा करण्यात आली असून त्यात कैस अहमद, बशीर अहमद आणि बहीर शाह यांचा समावेश आहे.अफगाणिस्तानचा हा भारत दौरा दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा मानला जात असून युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल साधण्याचा प्रयत्न संघ व्यवस्थापनाने केला आहे.