खान्देशच्या हृदयातील अहिराणी आता गुगल कीबोर्डवर

मिळाली अधिकृत मान्यता

    दिनांक :26-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Ahirani on Google Keyboard खान्देशची सांस्कृतिक ओळख मानली जाणारी अहिराणी बोली आता डिजिटल जगात अधिकृतपणे मान्यता मिळाल्याने चर्चेत आली आहे. गुगलने अहिराणी भाषेला आपल्या प्रणालीत समाविष्ट केल्याने आता ही भाषा गुगल कीबोर्डवर सहज टाईप करता येणार आहे. या निर्णयामुळे खान्देशवासीयांमध्ये आनंद आणि अभिमानाची भावना व्यक्त केली जात आहे. अहिराणी ही केवळ बोली नसून खान्देशच्या लोकजीवनाचा, संस्कृतीचा आणि परंपरेचा आत्मा मानली जाते. गावखेड्यांतील संवाद, लोकगीते, सण-उत्सव आणि दैनंदिन व्यवहारात या भाषेचा गोडवा आजही तितकाच जिवंत आहे. आता जागतिक तंत्रज्ञान मंचावर या बोलीला स्थान मिळाल्याने तिच्या संवर्धनाला मोठी चालना मिळणार आहे.
 
 

ahirani language 
या यशामागे अनेक वर्षांचे सातत्यपूर्ण प्रयत्न कारणीभूत ठरले आहेत. जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद, उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ तसेच विविध सामाजिक, सांस्कृतिक संस्था, साहित्यिक, कवी आणि भाषा अभ्यासकांनी ही भाषा जिवंत ठेवण्यासाठी सातत्याने काम केले आहे. गुगलच्या या निर्णयामुळे नव्या पिढीला अहिराणी भाषेशी अधिक जोडले जाण्याची संधी मिळणार असून डिजिटल माध्यमातही ही मायबोली अधिक मजबूतपणे पुढे येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. “जी भाषा टिकते, ती संस्कृती टिकते” या भावनेतून खान्देशवासीयांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.