सेलू,
board was also placed in bori काही महिन्यांपूर्वी वाहीतपूर या गावात लागलेल्या फलकाने जिल्ह्यात खळबळ उडवून दिली होती. तसाच फलक आता पर्यटनस्थळ असलेल्या बोरी बोरधरण या गावात लागल्याने दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात असे फलक लावण्याची वेळ ग्रामस्थांवर यावी, ही शोकांतिका नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बोरी (कोकाटे) हे गाव जंगलव्याप्त भागात येत असले तरी गावाला लागून बोरधरण हे पर्यटन स्थळ आहे. येथे मोठ्या प्रमाणात गावठी मोहा दारू विकली जाते, नव्हे याच भागात दारूच्या भट्ट्या असून ही दारू तालुयातच नव्हे तर दूरवर पुरवठा केली जात असल्याचे बोलल्या जात आहे.

या गावातील माँ दुर्गा दारूबंदी महिला मंडळाने या बाबतीत सेलू पोलिस स्टेशन व संबंधित विभागाला निवेदन दिले होते. गावातील दारू विक्रेत्यांचे घरेही पोलिसांना या मंडळाने दाखवून दिल्यानंतरही गावातील दारू विक्रेत्यांनी दारू विकणे बंद केले नाही. त्यामुळे ‘होय आमच्याही गावात मिळते दारू’, म्हणण्याची वेळ नव्हे तर फलक लावून इतरांना सांगण्याची वेळ या गावातील महिलांवर आली आहे. गावठी दारूमुळे गावातील तरुणांवर याचा परिणाम होत असल्याचे महिला मंडळ सांगत आहे. दुधापेक्षा दारू महाग हे वास्तव सांगणारा फलक आता बोरी गावात लागल्याने असे फलक प्रत्येक गावात तर लागणार नाही ना, असे बोलल्या जात आहे.
गावातील चार तरुणांचा या गावठी दारूमुळे मृत्यू झाला. अनेकजण दारूच्या आहारी गेले आहे. पोलिसात तक्रार करूनही येथील दारूचे धंदे बंद होत नाही. त्यामुळे येथील दुर्गा महिला मंडळाने फलक लावण्याचे पाऊल उचलले असून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी या मंडळाला साथ देत असल्याचे गोविंदा पेटकर यांनी सांगितले.
दारूचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावत असून गाव तेथे दारू अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाहीतपूर येथे अश्याच प्रकारचा फलक लागला तो चर्चेचा विषय झाला. आता बोरी येथेही तसाच फलक लागल्याने सेलू तालुयातील गावामध्ये दारूचा महापूर ओसंडून वाहत असल्याची वास्तव परिस्थिती दिसून येत आहे.