बोलेरो-दुचाकीच्या भीषण अपघातात दोघे ठार

    दिनांक :26-May-2026
Total Views |
धानोरा, 
Bolero-Two-wheeler Accident लग्न समारंभ आटोपून आनंदाने गावी परतणार्‍या वरातीवर काळाने घाला घातला. वरातीची बोलेरो आणि विरुद्ध दिशेने येणार्‍या दुचाकीची समोरासमोर भीषण धडक होऊन दुचाकीस्वारासह बोलेरोमधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर गरोदर महिलेसह 17 जण जखमी झाले. त्यापैकी 10 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. ही दुर्घटना रविवारी, 25 मे रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास मालेवाडा-येरकड मार्गावरील सुरसुंडी गावाजवळील धोकादायक वळणावर घडली. मृतांमध्ये बबीता गावतुरे (56) रा. चिंचोली, यांचा समावेश असून दुसरा मृत व्यक्ती दुचाकीस्वार असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव येथील वरात मालेवाडा येथे लग्न समारंभासाठी गेली होती. लग्नविधी पार पडल्यानंतर वरातीची बोलेरो गाडी परत गावाकडे निघाली होती. त्याचवेळी येरकड येथून एक दुचाकीस्वार दुसर्‍या लग्नसमारंभासाठी पुराडाकडे जात होता. सुरसुंडी गावाजवळील वळणावर दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली.
 
 
ccident
 
 
धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की बोलेरो वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. अपघातानंतर घटनास्थळी एकच आक्रोश पसरला. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमींना बाहेर काढले. या अपघातातील जखमींमध्ये रोशन ठलाल (26), गौतम मडावी (30) दोघेही रा येरकड, जयश्री शेंडे (45) रा. तळेगाव, देवांगना गावतुरे (गरोदर माता, चिंचोली), अशोक मोहुर्ले (15) माडेमुल, मिराबाई गुरनुले (60) रा. मोहली, शालू मोहुर्ले (41) रा माडेमुल, पी. एल. गावतुरे (9) वंशिका गावतुरे (6) सुखदेव गावतुरे (35) तिघेही रा. चिंचोली, शिवम गावतुरे (5) मोहली, सोनू मोहुर्ले (13) रा. माडेमुल, मिराबाई गुरनुले (58) रा. मोहली, शालू मोहुर्ले (38) रा. माडेमुल, राकेश गावतुरे (35) रा. चिंचोली, कमल ठलाल (17) रा. मुस्का आणि अद्विका शेंडे (3) रा. तळेगाव यांचा समावेश आहे. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून उर्वरित जखमींवर धानोरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेचा पुढील तपास धानोरा पोलिस करीत आहे.