भोपाळ,
CBI's Focus in the Twisha Case भोपाळमध्ये घडलेल्या ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्यानंतर आता या प्रकरणाला वेग आला आहे. तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सीबीआयने पहिल्याच दिवशी थेट कारवाई करत ट्विशाची सासू गिरीबाला सिंग यांच्या घराची तपासणी केली. अधिकाऱ्यांचे पथक तीन वाहनांमधून घटनास्थळी पोहोचले आणि जवळपास अर्धा तास घरातील विविध भागांची पाहणी करत पुरावे गोळा केले. तपास पथकात दोन महिला अधिकाऱ्यांचाही समावेश होता. तपास पूर्ण झाल्यानंतर अधिकारी कोणतीही प्रतिक्रिया न देता तेथून निघून गेले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही व्यक्तींशीही चर्चा करून माहिती घेतल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर तपास पथक ट्विशाच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी रवाना झाले. या प्रकरणात ट्विशाचा पती समर्थ सिंग आणि सासू गिरीबाला सिंग यांना आरोपी करण्यात आले असून, भारतीय दंड संहितेतील विविध कलमे तसेच हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार, घटनेच्या रात्री ट्विशाने रात्री ९:४१ वाजता तिच्या आईशी फोनवर संवाद साधला होता. त्या संभाषणादरम्यान पार्श्वभूमीत समर्थ सिंग ओरडत असल्याचा आवाज ऐकू आला आणि काही क्षणांतच फोन अचानक कट झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, सासू गिरीबाला सिंग यांनी फोन उचलून “ती आता जिवंत नाही” असे सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ट्विशाच्या शरीरावर आढळलेल्या जखमा. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण गळफास असल्याचे नमूद असले तरी शरीराच्या इतर भागांवर अनेक गंभीर जखमा आढळल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या जखमा बोथट वस्तूच्या मारामुळे किंवा जोरदार आघातामुळे झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे मृत्यूपूर्वी तिच्यावर अत्याचार झाला होता का, याचा तपास आता सीबीआय करणार आहे.
ट्विशाच्या कुटुंबीयांनी लग्नानंतरपासूनच तिचा मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा आरोप केला आहे. डिसेंबर २०२५ मध्ये विवाह झाल्यानंतर हुंड्यावरून सातत्याने वाद होत होते, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच आर्थिक व्यवहारांबाबतही घरात सतत तणावाचे वातावरण असल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले आहे.दरम्यान, माजी जिल्हा न्यायाधीश गिरीबाला सिंग या आपल्या प्रभावाचा वापर करून तपासावर परिणाम करण्याचा प्रयत्न करत होत्या का, हाही तपासाचा मोठा मुद्दा ठरत आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर त्यांनी विविध वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या होत्या. पीडितेच्या कुटुंबीयांनी याला तपास दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.
घटनेच्या रात्री समर्थ सिंग ट्विशाला रात्री १०:२० वाजता भोपाळमधील एम्स रुग्णालयात घेऊन गेला होता. मात्र डॉक्टरांनी तिला रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले. या संपूर्ण प्रकरणात एफआयआर दाखल करण्यास झालेला उशीर, पोलिसांची भूमिका आणि त्यानंतरची प्रक्रिया याचाही सीबीआयकडून सखोल तपास केला जाणार आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात निष्पक्ष तपास होण्याची गरज अधोरेखित केली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने पीडित आणि आरोपी दोघांच्याही हक्कांचे संरक्षण केले जाईल, असे स्पष्ट केले. तसेच दोन्ही कुटुंबीयांनी प्रसारमाध्यमांमध्ये सार्वजनिक विधाने करण्याऐवजी तपास यंत्रणेसमोर आपली बाजू मांडावी, असे आवाहनही न्यायालयाने केले आहे.