नागपूर,
Celebration at Nirmal Nagari Temple उमरेड मार्गावरील निर्मल नगरी मंदिरात श्री संत गजानन महाराज सेवा ट्रस्टच्या वतीने आयोजित ३५ व्या सामूहिक महापारायणाचा कार्यक्रम भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. संपूर्ण वातावरण “गण गण गणात बोते” या गजराने आणि श्री गजानन महाराजांच्या जयघोषाने भक्तिमय झाले होते. या कार्यक्रमात श्री गजानन विजय ग्रंथाच्या १ ते २० अध्यायांचे सकाळी ६ ते ११ या वेळेत सामूहिक पठण करण्यात आले. त्यानंतर ११.३० वाजता २१ व्या अध्यायाचे पठण आणि आरती पार पडली.त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली आणि हजारो भाविकांनी त्याचा आस्वाद घेतला.
यंदा महाप्रसादात आंब्याचा रसाचा समावेश होता. विशेष म्हणजे चौथ्या वर्षी आंब्याचा रस देण्यात आल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. कडक उन्हाच्या परिस्थितीतही भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला. मंदिरातील शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि आयोजकांच्या अथक परिश्रमांमुळे संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पडला. भाविकांनी महाप्रसादाचा आनंद घेत हा अनुभव “जणू शेगावचेच दर्शन” असल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान भक्ती, सेवा आणि एकात्मतेचे सुंदर दर्शन घडले.