जनगणनेमुळे बदल्यांच्या वेळापत्रकात बदल!

राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

    दिनांक :26-May-2026
Total Views |
मुंबई,
Changes in transfer schedule due to census मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी जनगणना 2027 च्या कामकाजावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी यंदाच्या सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.या निर्णयानुसार आता राज्य सरकारला 30 जून 2026 पर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या राबवण्याची परवानगी मिळणार आहे. जनगणनेचा पहिला टप्पा 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत होणार असून या काळात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय कर्मचारी प्रत्यक्ष कामात गुंतलेले असतील. त्यामुळे बदल्यांमुळे जनगणनेच्या कामात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
 
 
fadnavis
या मुदतवाढीसाठी महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन अधिनियम 2005 मध्ये आवश्यक सुधारणा करण्याचा मसुदाही मंजूर करण्यात आला आहे. यासंदर्भातील अध्यादेश राज्यपालांच्या मान्यतेनंतर लवकरच जारी केला जाणार असून, त्यानंतर हा निर्णय अधिकृतपणे लागू होईल.दरम्यान, याच मंत्रिमंडळ बैठकीत कोकणवासीयांसाठीही एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि माजी रेल्वेमंत्री स्व. मधु दंडवते यांचे नाव सावंतवाडी रेल्वे स्थानकाला देण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारची अंतिम मान्यता मिळाल्यानंतर हे स्थानक “लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस” या नावाने ओळखले जाईल. कोकण रेल्वे प्रकल्प उभारण्यात मधु दंडवते यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले असून त्यांच्या स्मृती जपण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.