मुख्यमंत्र्यांचा थेट फोन अन् अट्टीवागू आंदोलनाला यश

    दिनांक :26-May-2026
Total Views |
सिरोंचा, 
Chief Minister's call to the protesters टेकडाताल्ला-कंबालपेठा मार्गावरील अट्टीवागू नाल्यावरील रखडलेल्या पुलाच्या बांधकामासाठी सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषण आंदोलनाच्या दुसर्‍याच दिवशी मोठी घडामोड घडली. आंदोलनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट दखल घेत आंदोलनकर्त्यांशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. मी तात्काळ निधी उपलब्ध करून देऊन संबंधित विभागाला काम सुरू करण्याचे आदेश देणार आहे, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. सिरोंचा तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाला परिसरातील जवळपास 30 गावांतील नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला होता. मागील दीड वर्षांपासून अर्धवट अवस्थेत पडून असलेल्या पुलामुळे पावसाळ्यात संपूर्ण परिसर संपर्कबाह्य होण्याची भीती निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, रुग्णांची गैरसोय तसेच दळणवळण व्यवस्था ठप्प होण्याच्या पृष्ठभूमीवर नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता.
 
 
caklla
 
 
दरम्यान, आंदोलनाची बातमी एका मराठी चॅनेलवर झळकल्यानंतर राज्यभर याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आंदोलनकर्त्यांशी संपर्क साधत परिस्थितीची माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने आंदोलनस्थळी एकच जल्लोष पाहायला मिळाला. मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद झाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी अत्यंत भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही अतिदुर्गम भागातील लोक आहोत. आमच्या समस्या ऐकून थेट फोनवर बोलणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत. आमच्यासारख्या शेवटच्या टोकावर राहणार्‍या लोकांपर्यंत विकास पोहोचवण्याची त्यांची भूमिका आम्हाला आश्‍वस्त करणारी आहे. त्यांनी आमच्याशी थेट संवाद साधला, हे आमचे भाग्य आहे, अशा शब्दांत आंदोलनकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
 
 
यावेळी प्रभारी तहसीलदार हलामी, निवासी नायब तहसीलदार सिडाम, भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा सचिव संदीप राचर्लावार तसेच व्यापारी आघाडीचे अध्यक्ष रविचंद्र पवार यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून आंदोलनकर्त्यांना लिंबूपाणी देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले असले, तरी आता प्रत्यक्षात पुलाचे काम किती वेगाने सुरू होते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.