नवी दिल्ली,
China Fumes After Quad Talks in Delhi! नवी दिल्ली येथे पार पडलेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीनंतर चीनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. चतुर्भुज सुरक्षा संवादांतर्गत ही बैठक नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे पार पडली. बैठकीचे अध्यक्षपद भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भूषवले. या बैठकीला अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री उपस्थित होते.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या बैठकीवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, कोणतेही आंतरराष्ट्रीय सहकार्य हे प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य वाढवणारे असावे, ते कोणत्याही तिसऱ्या देशाला लक्ष्य करणारे नसावे. बीजिंगने स्पष्ट शब्दांत सांगितले की, कोणत्याही प्रकारच्या गटबाजीला किंवा संघर्ष वाढवणाऱ्या आघाड्यांना त्यांचा विरोध आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनीही याच भूमिकेचा पुनरुच्चार केला. त्यांनी सांगितले की क्वाडसारख्या संघटनांनी कोणत्याही देशाविरुद्ध धोरणात्मक दबाव निर्माण करू नये.
दरम्यान, क्वाड बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात मुक्त आणि खुल्या इंडो-पॅसिफिक क्षेत्राला पाठिंबा देण्यात आला असून, प्रदेशातील देशांना स्वतंत्रपणे विकासाची संधी मिळावी यावर भर देण्यात आला आहे. तसेच, फिजीमध्ये बंदर विकास प्रकल्प आणि महत्त्वपूर्ण खनिजे तसेच ऊर्जा सुरक्षेवर सहकार्य वाढवण्याचेही ठरवण्यात आले आहे. चीनने मात्र या निवेदनावर आक्षेप घेत, समुद्री क्षेत्रातील हालचाली, जहाज वाहतूक आणि लष्करी घडामोडींवर चिंता व्यक्त केली आहे. बीजिंगच्या म्हणण्यानुसार, काही देशांकडून प्रदेशात दबाव निर्माण करणाऱ्या आणि एकतर्फी कृती केल्या जात आहेत, ज्यामुळे शांतता धोक्यात येऊ शकते.या घडामोडींमुळे भारत-प्रशांत क्षेत्रातील भू-राजकीय तणाव पुन्हा एकदा वाढल्याचे दिसून येत आहे.