- 54 लाखांचा मुद्देमाल हस्तगत : स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई
गोंदिया,
'Cinematic-style' Ganja Seized जिल्ह्यातील अवैध अंमली पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले असून, पथकाने डुग्गीपार पोलिस ठाण्याच्या हद्दीत 38 किलो 500 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 54 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे, तर एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी अवैध अंमली पदार्थ बाळगणारे, विक्री, साठा आणि वाहतूक करणार्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या नेतृत्वाखालील पथक 24 मे रोजी डुग्गीपार पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होते. यावेळी रायपूर (छत्तीसगड) येथून एका काळ्या रंगाच्या महिंद्रा थार कारमधून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 06 वरून देवरी-कोहमारा मार्गाने नागपूरकडे मोठ्या प्रमाणात गांजा नेला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
'Cinematic-style' Ganja Seized माहितीच्या आधारे पोलिसांनी सौंदड रेल्वे उड्डाणपुलाजवळ नाकाबंदी केली. काही वेळातच संशयित थार कार तेथे आली. मात्र, पोलिसांची नाकाबंदी पाहताच आरोपींनी वाहन विरुद्ध दिशेने वळवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी एलसीबी पथकाने तत्काळ कारचा पाठलाग करून सिनेस्टाईलने वाहन थांबवले. वाहन थांबताच कारमधील तीन इसम जंगलाच्या दिशेने पळून जाऊ लागले. पोलिसांनी चपळाईने पाठलाग करून दोन आरोपींना ताब्यात घेतले, तर तिसरा आरोपी दाट झुडपांचा व अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. दरम्यान, वाहनाची झडती घेतली असता कारच्या डिक्कीत व मधल्या सीटवर प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये खाकी टेपने गुंडाळलेले गाजांचे 38 किलो 500 ग्रॅम वजनाचे 40 बंडल्स आढळून आले. जप्त गांजाची किंमत 38 लाख 50 हजार रुपये असून, थार कार, चार मोबाईल फोन आणि गांजासह एकूण 54 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणात विवेककुमार अश्विनीकुमार जोशी (21) रा. डोंगरगढ, जि. राजनांदगाव (छग) याला अटक करण्यात आली असून, एका विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. तर सुफियान उर्फ सोफी रजा (रा. रज्जानगर, डोंगरगढ) हा आरोपी फरार झाला आहे. सदर गांजा नागपूर येथील सागर खोब्रागडे याला विक्रीसाठी नेला जात असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. या सर्व आरोपींविरुद्ध डुग्गीपार पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.