मुंबई,
Dispute over goats in Mira Road मुंबईजवळील मीरा रोड परिसरातील पूनम स्टेट क्लस्टर-१ सोसायटीमध्ये बकरीदच्या आधी मोठा वाद निर्माण झाला. सोसायटीच्या आवारात बकऱ्या आणून ठेवण्यात आल्याने रहिवाशांनी तीव्र आक्षेप घेतला आणि वातावरण तापले. मिळालेल्या माहितीनुसार, बकरीदच्या निमित्ताने बळी देण्यासाठी सुमारे २५ बकऱ्या सोसायटीच्या परिसरात आणण्यात आल्या होत्या. त्यांना तात्पुरत्या पत्र्याच्या शेडमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र या बांधकामाबाबत कोणतीही परवानगी किंवा रहिवाशांशी चर्चा करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला.
रहिवाशांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत निवासी परिसरात परवानगीशिवाय प्राण्यांचा बळी देणे बेकायदेशीर असल्याचे सांगत विरोध केला. या विरोधानंतर स्थानिक राजकीय नेते आणि संघटनांच्या तक्रारीनंतर महापालिका अधिकाऱ्यांनी तात्पुरती शेड पाडली.शेड हटवल्यानंतरही बकऱ्या सोसायटीच्या परिसरातच राहिल्याने सोमवारी रात्री पुन्हा तणाव निर्माण झाला. यावेळी झालेल्या वादावादीत आणि झटापटीत एका तरुणावर ब्लेडने हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
प्रकरण चिघळू नये म्हणून पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला असून पुढील तपास सुरू आहे. प्रशासनाने स्पष्ट केले की, सोसायटीमध्ये बळी देण्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नव्हती. दरम्यान, रहिवाशांनी पुन्हा आंदोलन करत कारवाईची मागणी केली असून संपूर्ण प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण कायम आहे.