सँटियागो,
Earthquake in Northern Chile दक्षिण अमेरिकेतील चिली देशात जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ अमेरिका या संस्थेच्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.९ इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू अटाकामा वाळवंट परिसरातील कालामा शहराजवळ सुमारे १०० किलोमीटर खोलीवर असल्याचे सांगण्यात आले आहे. भूकंपाचे धक्के तीव्र असले तरी कोणतीही मोठी जीवितहानी किंवा गंभीर नुकसान झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. चिली विद्यापीठाच्या राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानुसार, स्थानिक वेळेनुसार सायंकाळी ५:५२ वाजता हा भूकंप झाला. त्याचा केंद्रबिंदू कालामा शहराच्या दक्षिणेस काही किलोमीटर अंतरावर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
भूकंपानंतर काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक लोक घराबाहेर पडून सुरक्षित स्थळी गेले. मात्र चिलीच्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिबंध आणि प्रतिसाद विभागाने त्सुनामीचा कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट करत नागरिकांना दिलासा दिला आहे.चिली हा जगातील सर्वाधिक भूकंपप्रवण देशांपैकी एक मानला जातो. या भागात नाझ्का प्लेट, दक्षिण अमेरिकन प्लेट आणि अंटार्क्टिक प्लेट या तीन मोठ्या टेक्टॉनिक प्लेट्स एकत्र येतात. त्यामुळे या परिसरात वारंवार भूकंप होणे सामान्य मानले जाते.यापूर्वीही चिलीने अनेक विनाशकारी भूकंप अनुभवले आहेत. १९६० मध्ये वाल्दिव्हिया येथे झालेल्या ९.५ तीव्रतेच्या भीषण भूकंपात हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच २०१० मध्ये मध्य चिलीमध्ये झालेल्या ८.८ तीव्रतेच्या भूकंपानेही मोठ्या प्रमाणात जीवित आणि आर्थिक हानी केली होती.