शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेसचा एल्गार

    दिनांक :26-May-2026
Total Views |
पीक विमा, वीज व डिझेल प्रश्नांवर ट्रॅक्टर-डबकी मोर्चा

यवतमाळ, 
खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर उभ्या ठाकलेल्या डीएपी व युरिया खतांच्या कृत्रिम टंचाई, बोगस खते-बियाणे-कीटकनाशकांचा वाढता सुळसुळाट, रखडलेला पीक विमा, वाढते पेट्रोल-डिझेल दर तसेच अपुरा व विस्कळीत वीजपुरवठा या गंभीर प्रश्नांवर मंगळवार, 26 मे रोजी यवतमाळ शहरात काँग्रेसच्यावतीने ट्रॅक्टर-डबकी मोर्चा काढण्यात आला. यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वात तालुका काँग्रेस, शहर काँग्रेस, जिल्हा युवक काँग्रेस तसेच काँग्रेस पक्षाच्या विविध आघाड्यांच्यावतीने या भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चाची सुरुवात यवतमाळ शहरातील मेडिकल चौक येथून करण्यात आली. त्यानंतर लाठीवाला पेट्रोल पंप मार्गे संविधान चौक, दत्त चौक, महात्मा ज्योतिबा फुले स्मारक परिसरातून हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
 
 
y26May-Congress
 
ट्रॅक्टर, डबकी आणि जोरदार घोषणाबाजीमुळे संपूर्ण शहराचे लक्ष या आंदोलनाकडे वेधले गेले. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी विकास मीना यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात शेतकèयांना शेती मशागत व कृषी कामांसाठी कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून देणे, शेतीसाठी रात्रीची सिंगल फेज वीज सुरळीत सुरू करणे, सोयाबीन, कापूस व तुरीचा रखडलेला पीक विमा मंजूर करणे, डीएपी व युरिया खतांचा पुरेसा पुरवठा करणे, बोगस खते, बियाणे, कीटकनाशकांवर कठोर कारवाई करणे, इंधन दरवाढ कमी करणे या प्रमुख मागण्या आहेत.
 
 
शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी आ. बाळासाहेब मांगुळकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तत्काळ निर्णय न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. मोर्चामध्ये तालुका काँग्रेस अध्यक्ष रमेश भिसनकर, शहर काँग्रेस अध्यक्ष प्रा. डॉ. बबलू देशमुख, बाजार समिती सभापती रवी ढोक, विरोधी पक्षनेत्या वैशाली सवाई, माजी जिप सदस्य स्वाती येंडे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद बगाडे, राजेंद्र गौतम, प्रा. पंढरी पाठे, कृष्णा पुसनाके, उत्तम खंदारे, जाफर खान, अशोक भुतडा, नंदू कुडमेथे, गोविंद वंजारी, शुभम शेंडे, नईम पैलवान, संतोष बोरले, सुनील बोरकर, दत्ता हाडके, भालचंद्र कलाने, सवाई राठोड, नौशाद पटेल, जुबेर सय्यद, अजय परचाके, गोवर्धन ढोबळे, आवेश पटेल, अंकुश भोंडे, लक्ष्मण पवार, राम राऊत, अमोल मेहेर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, युवक व काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होते.