नवी दिल्ली,
रितेश देशमुख अभिनित आणि दिग्दर्शित 'राजा शिवाजी' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी करत आहे. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या ऐतिहासिक चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, अवघ्या २५ दिवसांत चित्रपटाने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीसाठी हा चित्रपट एक मोठा टप्पा मानला जात आहे. मराठीसोबतच हिंदी भाषेतही प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांची मनं जिंकली. चित्रपटात रितेश देशमुखसोबत जेनेलिया डिसूझा, अभिषेक बच्चन, संजय दत्त आणि विद्या बालनयांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेचसलमान खान याची विशेष झलकही चित्रपटात पाहायला मिळते. निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘राजा शिवाजी’ने प्रदर्शनाच्या २४ दिवसांत भारतात तब्बल १०१.४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या कमाईसह १०० कोटींचा टप्पा पार करणारा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे. यामुळे मराठी सिनेसृष्टीत नव्या इतिहासाची नोंद झाली आहे. देशांतर्गतच नव्हे तर जगभरातही या चित्रपटाने मोठी कमाई केली आहे. जागतिक बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने ११४ कोटी रुपयांहून अधिक कमाई करत मराठी चित्रपटसृष्टीसाठी नवा मानदंड निर्माण केला आहे.