मुंबई इंडियन्स सोडून हार्दिक चेन्नईत?

    दिनांक :26-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Hardik Leaves Mumbai Indians आयपीएल 2026 संपल्यानंतर आता पुढील हंगामाची आणि विशेषतः 2027 ची चर्चा जोरात सुरू झाली आहे. सोशल मीडियावर सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स (MI) सोडून चेन्नई सुपर किंग्स (CSK) मध्ये जाणार का, हा प्रश्न. या चर्चेला सुरुवात हार्दिकच्या एका इंस्टाग्राम स्टोरीमुळे झाली आणि त्यानंतर त्यात आणखी भर पडली आहे. वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरुद्ध मुंबई इंडियन्सला पराभव स्वीकारावा लागल्यानंतर हार्दिक पांड्याने एक स्टोरी पोस्ट केली होती. त्या फोटोमध्ये ‘07:07’ अशी वेळ दिसत होती. चाहत्यांनी लगेचच याचा संबंध एमएस धोनीच्या जर्सी क्रमांक ‘07’ आणि चेन्नई सुपर किंग्सशी जोडला आणि सोशल मीडियावर अफवांना मोठी हवा मिळाली.
 
 

Mumbai Indians 
 
या चर्चेला आणखी उधाण भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या प्रतिक्रियेमुळे आले. एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना अश्विनने पुन्हा ‘07:07’चा उल्लेख करत सूचक संकेत दिल्याने चर्चेचा जोर वाढला. त्याने संभाव्य संघबदल आणि काही खेळाडूंच्या भूमिकांबाबतही अप्रत्यक्षपणे मत व्यक्त केल्याने चाहत्यांमध्ये आणखी संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ससाठी आयपीएल 2026 चा हंगाम अत्यंत निराशाजनक ठरला. गुजरात टायटन्सविरुद्ध पराभवानंतर सीएसके सलग तिसऱ्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचू शकली नाही. दुसरीकडे मुंबई इंडियन्समध्येही परिस्थिती समाधानकारक नसून हार्दिक पांड्याचा फॉर्मही चर्चेचा विषय ठरला आहे. त्याने हंगामात 10 सामन्यांत फक्त 206 धावा केल्या आणि 4 विकेट्स घेतल्या. सध्या हार्दिक पांड्या CSK मध्ये जाणार याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी नाही. मात्र ‘07:07’ पोस्ट आणि अश्विनच्या प्रतिक्रियांमुळे IPL वर्तुळात चर्चांचा भडका उडाला आहे. आगामी काळात या अफवांना वास्तवाचे रूप मिळते की नाही, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.