अमरावतीच्या रामपुरी कॅम्प परिसरात शिरला बिबट्या

    दिनांक :26-May-2026
Total Views |
तब्बल चार तासानंतर जेरबंद
नागरिकांची तोबा गर्दी
 
अमरावती, 
Leopards in Amravati शहरातील रामपुरी कॅम्प परिसरात बिबट्या आढळून आल्याने मंगळवारी दुपारी एकच खळबळ उडाली. दाट लोकवस्ती असणार्‍या या परिसरात बिबट आला आणि एका दुकानात शिरला. त्यानंतर तो लागूनच असलेल्या दुकान मालकाच्या घरात शिरला. त्याला पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी केली होती. चार तासाच्या प्रयत्नानंतर बिबट जेरबंद झाल्यावर नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.
 
 
Leopards in Amravati
 
Leopards in Amravati मंगळवारी दुपारी रामपुरी कॅम्प परिसरात काही जणांना बिबट्या आढळून आला आणि पाहता पाहता बिबट्या शिरल्याची माहिती वार्‍यासारखी शहरभर पसरली. बिबट्याला पाहण्यासाठी रामपुरी कॅम्प परिसरासह लगतच्या भागातील तुफान लोकांची गर्दी रामपुरी कॅम्प भागात झाली. बिबट्या एका दुकानात शिरला. प्रसंगावधान दाखवून त्या दुकानाचे शटर बंद करण्यात आले, अशी माहिती काही लोकांनी दिली. मात्र, बिबट्या नेमका कुठे आहे बर्‍याच वेळ लक्षात आले नाही. वन विभागाचे व पोलिसांचे पथक घटनास्थळी आल्यावर त्यांनी शोध सुरू केला. त्या तपासणी बिबट्या दुकानातून बाजुलाच लागून असलेल्या घरात जाऊन कुलरवर बसल्याचे आढळले. दरम्यान, परिसरात होणारा गोंधळ पाहता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. अथक परिश्रमानंतर वनविभागाच्या चमूने बिबट्याला पिंजर्‍यात जेरबंद केले. अमरावतीत मागील काही महिन्यांपासून वेगवेगळ्या भागात बिबट्या आढळून आल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.