अमेरिकन तळांना सहन करणार नाही!

इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा

    दिनांक :26-May-2026
Total Views |
तेहरान,
Mojtaba Khamenei's Warning नवी इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी अमेरिकेला तीव्र इशारा देत मध्य-पूर्वेत त्यांच्या लष्करी तळांची उपस्थिती यापुढे सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. खामेनेई यांनी इस्लामिक जगतात वापरल्या जाणाऱ्या अमेरिका आणि इस्रायलविरोधी घोषणांना एकतेचे प्रतीक म्हणून संबोधले असून त्या जगभरातील शोषित लोकांच्या संघर्षाचा आवाज बनावा, असे आवाहन केले आहे. त्यांच्या कार्यालयाने एक्सवर जारी केलेल्या संदेशात मध्य-पूर्वेतील देश आता अमेरिकेच्या लष्करी तळांसाठी ढाल बनणार नाहीत, तसेच या प्रदेशात अमेरिका कोणतेही सुरक्षित स्थान निर्माण करू शकणार नाही, असे ठामपणे म्हटले आहे.
 
 
 
Mojtaba
या निवेदनात मुस्लिम देशांनी सुरू असलेल्या हज यात्रेच्या काळाचा उपयोग अमेरिका आणि इस्रायलविरोधात जागतिक निषेध व्यक्त करण्यासाठी करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. यामुळे धार्मिक आणि राजकीय पातळीवर या विधानांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.दरम्यान, मोजतबा खामेनी यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूचा उल्लेख करत त्याला ‘दैवी पुनरुत्थान’ असे संबोधले. त्यांच्या म्हणण्यानुसार, इराणचे माजी सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचा २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका–इस्रायल संयुक्त हवाई हल्ल्यात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मोजतबा खामेनेई यांची इराणच्या सर्वोच्च नेतृत्वात निवड झाली असून ते सध्या देशातील तिसरे सर्वोच्च नेते मानले जातात.
 
 
इराणच्या नेतृत्वाने सर्व इस्लामिक देशांना एकत्र येऊन नवी इस्लामिक संस्कृती उभारण्याचे आवाहनही केले आहे. पॅलेस्टाईन आणि अल-अक्सा मशिदीच्या मुक्तीसाठी तसेच अमेरिकेविरुद्ध विजयासाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. सध्या अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी करण्यासाठी सुरू असलेल्या चर्चांना मंद गती मिळाल्याने परिस्थिती अधिक संवेदनशील बनली आहे.