इस्लामाबाद,
Pakistan Rejects Trump's Condition अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानसह काही मुस्लिम देशांनी अब्राहम करारावर स्वाक्षरी करावी, अशी भूमिका मांडल्यानंतर पाकिस्तानमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या या प्रस्तावाला पाकिस्तानने स्पष्ट शब्दांत नकार दिला असून, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अमेरिकेवर आणि इस्रायलशी संबंध सामान्य करण्याच्या कल्पनेवर तीव्र टीका केली आहे. ट्रम्प यांनी मुस्लिम देशांनी इस्रायलसोबत राजनैतिक आणि आर्थिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी अब्राहम करारात सहभागी व्हावे, असे आवाहन केले होते. या करारामध्ये आधीच संयुक्त अरब अमिराती आणि बहरीन या करारात सहभागी झाले आहेत. भविष्यात सौदी अरेबिया, कतार, पाकिस्तान, तुर्की, इजिप्त आणि जॉर्डन यांसारखे देशही सामील होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी या प्रस्तावाला थेट विरोध दर्शवला.

एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, पाकिस्तान आपल्या विचारसरणीच्या विरोधात जाणाऱ्या कोणत्याही कराराचा भाग होणार नाही. “आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही अशा कराराला मान्यता देणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानची जुनी भूमिका स्पष्ट करत सांगितले की, १९६७ पूर्वीच्या सीमांवर आधारित स्वतंत्र पॅलेस्टिनी राष्ट्र आणि पूर्व जेरुसलेम ही त्याची राजधानी मान्य होईपर्यंत पाकिस्तान इस्रायलला मान्यता देणार नाही. त्यांनी अमेरिकेच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित केले. ज्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवता येत नाही, त्यांच्यासोबत तुम्ही कसे बसू शकता? असा सवाल त्यांनी केला.
यावेळी त्यांनी पाकिस्तानी पासपोर्टवरील त्या उल्लेखाचाही संदर्भ दिला, ज्यामध्ये इस्रायलमध्ये प्रवासासाठी पासपोर्ट वैध नसल्याचे नमूद असते. इस्रायलसोबत संबंध सामान्य करण्याच्या विरोधात उभ्या असलेल्या पाकिस्तानी नेत्यांमध्ये ख्वाजा आसिफ आघाडीवर मानले जातात. दरम्यान, काही दिवसांपूर्वीही त्यांनी इस्रायलवर कठोर टीका करत त्याला “मानवतेवरील शाप” म्हटले होते. तसेच त्या प्रदेशात नरसंहार घडत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यामुळे अब्राहम कराराच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील मतभेद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.