कोलकाता,
Panic among Bangladeshi infiltrators पश्चिम बंगालमध्ये अवैध स्थलांतरितांविरोधातील कारवाईमुळे सीमावर्ती भागात हालचाली वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या काही व्हिडीओंमध्ये बांगलादेश सीमेच्या दिशेने लोकांची गर्दी दिसून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणही तापले आहे. भाजपने दावा केला आहे की, उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील हकीमपूर सीमावर्ती परिसरात अनेक लोक पुन्हा एकत्र येत आहेत. पक्षाच्या म्हणण्यानुसार, राज्यात अवैध बांगलादेशी स्थलांतरितांविरोधात कठोर भूमिका घेतल्यानंतर ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पक्षाने ‘डिटॅक्स, डिलीट आणि डिपोर्ट’ या धोरणाचा उल्लेख करत कारवाई अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
भाजपच्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील विविध भागांमध्ये अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या व्यक्तींना ओळखण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी काही ठिकाणी तात्पुरती होल्डिंग सेंटर्स उभारण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. मालदा येथे असे केंद्र तयार करण्यात आले असून, संबंधित व्यक्तींना तेथे ठेवून पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शुभेंदूं अधिकारी यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत कठोर भूमिका मांडली होती. नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच सिएएच्या कक्षेबाहेर असलेल्या लोकांना बेकायदेशीर घुसखोर मानले जाईल आणि त्यांना सीमा सुरक्षा दलाच्या ताब्यात दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. या घडामोडींमुळे सीमावर्ती भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून अधिकृत पातळीवर संपूर्ण तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे.