प्रचंड उष्णतेमुळे पिके धोक्यात
अंजनगाव सुर्जी,
Panpimpri Producers Face Financial Crisis प्रचंड तापमानाचा मोठा परिणाम पान पिंपरी या पिकावर झाला असून त्याचा फरक उत्पादनावर पडणार असल्याने पानपिंपरी उत्पादक शेतकर्यांमध्ये चिंचेचे वातावरण निर्माण झाले आहे. पानपिंपरी हे औषधी गुणधर्माने युक्त असलेले नाजुक आणि जोखमीचे पीक आहे. या औषधीयुक्त असलेल्या पानपिंपरीचा उपयोग आयुर्वेदिक औषधीमध्ये केल्या जातो. पानपिंपरी या पिकाची शेतामध्ये जानेवारी, फेब्रुवारीमध्ये लागवड केल्या जाते.
Panpimpri Producers Face Financial Crisis या पिकाचे उत्पादन अंजनगाव सुर्जीमध्ये केवळ बारी समाज अतिशय परिश्रमाने घेत असतो. एप्रिलपासून सुरू असलेली उष्णता वाढत गेल्याने तापमानात अधिकच वाढ होऊन ४० डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान गेल्याने पानपिंपरी या पिकाला धोका निर्माण झाला. कडक उन्हामुळे वेलीची पानगळ सुरू झाली. अति उष्णतेमुळे जमिनीतील ओलावा कमी झाल्याने रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली असून वेलीवर पाने पिवळी पडून गळण्याचे प्रमाण वाढले आहे. जास्त तापमानात या झाडांची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होत असते, त्यामुळे पाने वाळणे, कडा जळणे, पानावर पिवळे डाग येणे आणि झाडाचा ताजेपणा कमी होणे असा मोठा परिणाम या प्रचंड उष्णतेमुळे पानपिंपरी उत्पादनावर झाला असून यामुळे पानपिंपरी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. विशेष म्हणजे, बारी समाजातील ज्यांच्याजवळ शेती नाही असे शेतमजूर सुद्धा तीन ते चार जण मिळून शेती लागवणीने करतात, तर कुठे वाफे पद्धतीने करार करून पानपिंपरीची लागवड करतात. या अतिउष्णतेच्या परिणामामुळे पानपिंपरी उत्पादक शेतकरी, शेतमजूर अतिशय संकटात सापडले असून शासनाकडून आर्थिक मदतीची मागणी करीत आहे.