मुल्लानपूर
IPL मागील पाच सामन्यांपासून विजयी घोडदौड करीत असलेला आणि आक्रमक फलंदाजाचा समावेश असलेल्या मजबूत सनरायझर्स संघाविरुद्ध बुधवारी राजस्थान रॉयल्स संघ ‘करो या मरो’ची लढत लढणार आहे. यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेतील हा एलिमिनेटरचा सामना न्यू चंदीगडमधील मुल्लानपूरस्थित महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दिवस-रात्र सत्रात खेळला जाणार आहे. हा सामना खेळताना राजस्थान संघ त्यांच्यातुलनेत कमजोर वाटत असला तरी हैदराबादला 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी व वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांच्यापासून सावध राहावे लागणार आहे.

IPL यंदाच्या स्पर्धेत हैदराबाद संघाची सुरुवात चांगली राहिली नाही. मात्र, प्राथमिक साखळी फेरीतील दुसèया टप्प्यात या संघाला सूर गवसला. नियमित कर्णधार पॅट कमिन्स संघात परतल्यामुळे त्याचा फायदा या संघाला चांगला झाला. त्याच्या नेतृत्वात या संघाने गेल्या सात सामन्यांपैकी पाच सामन्यांमध्ये विजय संपादन केला. प्राथमिक साखळी फेरीत हैदराबाद संघाने राजस्थान संघाला दोनदा पराभूत केले. त्यामुळे कमिन्स आणि त्याच्या चमूला या महत्त्वपूर्ण व दबाव असलेल्या बाद फेरीच्या सामन्यात मानसिकदृष्ट्या चांगली सुदृढता प्राप्त झाली आहे.
IPL पात्रता फेरी आम्ही आधीच गाठायला हवी होती. मात्र, आम्हाला त्यासाठी चांगलीच प्रतीक्षा करावी लागली. अखेर आमचा संघ हे ध्येय गाठू शकला त्यामुळे आता आम्ही आणखी पुढे जाण्यासाठी प्रयत्न करू, असे राजस्थानचा कर्णधार रियाग पराग म्हणाला. राजस्थान संघातील आघाडीचा फलंदाज सूर्यवंशी (583 धावा), यशस्वी जयस्वाल (397) व ध्रुव जुरेल (458) यांनी सर्वाधिक काढल्या आहेत. हैदराबाद संघाच्या फलंदाजांनीही तोडीस तोड फलंदाजी केली आहे. त्यांच्या अभिषेक शर्मा (563 धावा), ट्रॅव्हिस हेड (393) आणि ईशान किशन (569) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. याच संघातर्फे चौथ्या क्रमाकांवर फलंदाजी करणाèया हेनरिक क्लासेनची कामगिरी दुर्लक्षून चालणार नाही. आतापर्यंत सर्वोत्कृष्ट फलंदाजी करताना क्लासेनने सर्वाधिक 606 धावांची नोंद केली आहे. दोन्ही संघांतील आघाडीच्या फलंदाजांमध्ये आक्रमक फलंदाजीची क्षमता असतानाही जयस्वाल आणि हेड यांना मात्र त्यांच्या कामगिरीत अपेक्षित सातत्य राखता आलेले नाही.
IPL हैदराबाद संघ स्पर्धेतील सर्वाधिक आक्रमक संघ म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच राजस्थानचे मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा यांना या संदर्भातील योजनेबाबत विचारण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले, त्यांचा संघ खूप चांगला आहे. ते खरंच चांगली फलंदाजी करीत आहेत. त्यांना स्वत:वर मोकळ्या मनाने खेळण्याचा विश्वास आहे आणि तसे ते खेळतही आहे. आम्हाला आपले सातत्य कायम राखावे लागणार आहे. आम्हाला शिस्तीत राहावे लागेल. आम्हाला ही जाणीव आहे की आमचा प्रतिस्पर्धी संघ 120 ते 130 धावा काढणार नाही. आम्हाला आपली लाईन आणि लेग्थबाबत आक्रमक राहावे लागणार आहे.