कांतारा वादानंतर रणवीरने चामुंडेश्वरी मंदिरात मागितली माफी!

    दिनांक :26-May-2026
Total Views |
म्हैसूर,
Ranveer at Chamundeshwari Temple रणवीर सिंग सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. एकीकडे 'डॉन ३' या चित्रपटावरून सुरू असलेला वाद, तर दुसरीकडे 'कांतारा' चित्रपटातील दृश्याच्या कथित नक्कल प्रकरणामुळे त्याच्यावर टीका होत आहे. या सर्व घडामोडींमध्ये रणवीर सिंगने म्हैसूरमधील प्रसिद्ध चामुंडेश्वरी मंदिर येथे जाऊन देवीचे दर्शन घेतले. रणवीर सिंगविरोधात दाखल करण्यात आलेल्या प्रकरणावर नुकताच कर्नाटक उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला होता. ‘कांटारा’मधील ‘दैवा’ सादरीकरणाशी साधर्म्य असलेल्या दृश्यावरून त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने हा एफआयआर रद्द करत रणवीरला चामुंडेश्वरी मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत रणवीर मंदिरात पोहोचला.
 
 
Ranveer
 
मंदिरात रणवीर अत्यंत साध्या आणि भक्तिभावाच्या मुद्रेत दिसून आला. त्याने हात जोडून देवीसमोर नतमस्तक होत प्रार्थना केली. काही वेळ तो मंदिराच्या परिसरात जमिनीवर बसून ध्यानस्थ अवस्थेतही दिसला. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या वादानंतर रणवीरने यापूर्वी सार्वजनिकरित्या माफी मागत आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्याने सांगितले होते की, त्याचा हेतूऋषभ शेट्टीच्या अभिनयाचे कौतुक करण्याचा होता. “एक अभिनेता म्हणून त्या दृश्यासाठी लागणारी मेहनत आणि समर्पण मी समजू शकतो. त्यांच्या कामाबद्दल मला प्रचंड आदर आहे,” असे रणवीरने म्हटले होते. तसेच आपल्या बोलण्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मनापासून माफी मागत असल्याचेही त्याने स्पष्ट केले होते.