सेलू,
Release water from Madan Unnai dam वाढत्या उष्णतेमुळे निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पृष्ठभूमीवर अखेर मदन उन्नई धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे परिसरातील शेतकरी, नागरिक तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागला असून गावकर्यांनी समाधान व्यत केले आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा प्रचंड वाढल्याने शेतशिवारातील विहिरी, नाले आणि पाणवठे कोरडे पडू लागले होते. हिरवा चारा नष्ट झाल्याने जनावरांसमोरही मोठे संकट उभे ठाकले होते. शेतीपिकांसह जनावरांच्या पाण्याची सोय करणे कठीण झाल्याने आकोली परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी प्रशासनाकडे मदन धरणातून जामणी कालव्यात पाणी सोडण्याची मागणी लावून धरली होती.

या मागणीची दखल घेत स्थानिक लोकप्रतिनिधींनी जलसंपदा विभागाशी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर संबंधित अधिकार्यांना तातडीने कारवाईचे निर्देश देण्यात आले. अखेर शुक्रवारी मदन उन्नई धरणातून उपमदन धरणाच्या दिशेने पाणी सोडण्याचा निर्णय अमलात आणण्यात आला. या निर्णयामुळे जामणी, आमगाव, मदनी, गिरोली, मदना आणि सुरगाव परिसरातील शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पिकांसाठी तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाल्याने ग्रामीण भागात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या तापमानाच्या पृष्ठभूमीवर प्रशासनाने योग्यवेळी घेतलेल्या या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.