मुंबई,
Schools in the State for 3 Days राज्यात वाढत्या पेट्रोल-डिझेल दरांमुळे स्कूल बस आणि व्हॅन चालकांवर मोठे आर्थिक संकट ओढावले असून, त्याचा थेट परिणाम आता शालेय शिक्षण व्यवस्थेवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील महिन्यात राज्यभरातील शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर स्कूल बस संघटनांनी सरकारसमोर महत्त्वाची मागणी मांडली आहे. आठवड्यातून फक्त तीन दिवस शाळा सुरू ठेवाव्यात आणि उर्वरित दोन दिवस ऑनलाइन वर्ग घेण्यात यावेत, असा प्रस्ताव संघटनांकडून देण्यात आला आहे.
स्कूल अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशनने इंधनाच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतींमुळे जुन्या दरात बससेवा चालवणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. वाढत्या खर्चामुळे बस चालक आणि मालकांचे आर्थिक गणित कोलमडले असून, सरकारने तातडीने अनुदान किंवा सवलती जाहीर कराव्यात, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. तसेच, १ जूनपूर्वी राज्य सरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे.
पालकांवर भर पडणार
गेल्या दहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चार वेळा वाढ झाली आहे. या कालावधीत पेट्रोल तब्बल ७ रुपयांपेक्षा अधिक महाग झाले असून, डिझेलच्या दरातही मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे स्कूल बस चालवण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूर स्कूल बस आणि स्कूल व्हॅन संघटनेने भाड्यात १० ते १५ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दरानुसार, ज्या पालकांकडून सध्या साधारण हजार रुपये भाडे घेतले जाते, त्यांना आता अधिक रक्कम मोजावी लागू शकते. त्यामुळे शिक्षणाचा खर्च आणखी वाढणार असून, त्याचा आर्थिक भार थेट पालकांवर पडणार आहे. दरवाढीला परिवहन विभागाची मान्यता मिळणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.