मोबाईलवर एकाचवेळी अलर्ट; नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण

    दिनांक :26-May-2026
Total Views |
नागपूर,
Simultaneous Mobile Alerts in Nagpur नागपुरात आज अनेक नागरिकांच्या मोबाईलवर एकाचवेळी आपत्कालीन अलर्ट मेसेज आल्याने काही काळ गोंधळ आणि खळबळ निर्माण झाली. अचानक आलेल्या या संदेशामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले, मात्र काही वेळानंतर हा मेसेज नियोजित तांत्रिक चाचणीचा भाग असल्याची माहिती समोर आली. हा अलर्ट देशभरात सुरू असलेल्या स्वदेशी मोबाईल आपत्ती इशारा प्रणालीच्या चाचणीचा भाग असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रणालीअंतर्गत ठराविक भागातील सर्व मोबाईल वापरकर्त्यांना एकाच वेळी संदेश पाठवून यंत्रणेची कार्यक्षमता तपासली जात आहे. त्यामुळे नागपुरसह विदर्भातील अनेक मोबाईल वापरकर्त्यांना हा संदेश प्राप्त झाला. चंद्रपूरातही असाच अलर्ट आल्याचे समोर आले आहे.
 
 
 

Alerts 
 
 
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांसह नागपूरमधील अनेक ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.तसेच काही भागांमध्ये रात्रीचे तापमानही जास्त राहण्याची शक्यता असल्याने उष्णतेचा त्रास वाढू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडताना काळजी घ्यावी आणि पुरेशी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मोबाईलवर आलेल्या अलर्टमुळे काही वेळ नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असला तरी हा केवळ प्रणाली चाचणीचा भाग असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून घाबरून न जाता अधिकृत हवामान इशाऱ्यांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.