अमरावती शहर व ग्रामीणमध्ये वादळी पाऊस

    दिनांक :26-May-2026
Total Views |
झाडांची पडझड, बाजार समितीतले धान्य भिजले
 
अमरावती, 
Stormy rain in Amravati अमरावती शहर व ग्रामीण भागात मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान वादळी पाऊस झाला. शहरात व ग्रामीण भागात काही ठिकाणी झाडांची पडझड झाली. घरांवरची टिनपत्रे उडाली. अमरावती जुना बायपास मार्गावरच्या दोन्ही बाजुंच्या भागांमध्ये जोरदार वादळी पाऊस झाला. कल्याण नगरमध्ये एक झाड घरावर कलडले. प्रशांत नगर, प्रवीण नगर, हनुमान नगर व अन्य काही भागात झाड पडल्याची माहिती आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीतले उघड्यावर असलेले शेतकर्‍यांचे व काही व्यापार्‍यांचे धान्य भिजले. त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. काही मिनिटांच्या वादळी पावसानंतर ढगाळ वातावरण कायम होते.
 
 
tin
 
वादळाचा राजुरवाडीला तडाखा
मोर्शी तालुक्यातील राजुरवाडी परिसराला वादळासह मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसला. त्याने झाडे उन्मळली, घरांवरची टिनपत्रे उडाली. मंगळवार २६ मे रोजी दुपारी मान्सूनपूर्व वादळासह पावसाने हजेरील लावली. काही भागातील टिनपत्रे उडाली, जाहिरातीचे फलके पडले, विद्युत तारा तुटल्या. खांब देखील पडले. अर्ध्याहून अधिक राजुरवाडीचा वीजपुरवठा खंडित झाला. सायंकाळपर्यत वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता. दुपारी ३ पासून सुमारे ४५ मिनिटे वादळासह मान्सूनपूर्व पावसाने अनेक ठिकाणी नुकसान केले. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. याशिवाय परिसरातील विद्युत खांब जमीनदोस्त झाले. गोठ्याचे व घरावरचे टिनपत्रे उडाली. अचानक आलेल्या वादळासह पावसाने नागरिकांची त्रेधा उडाली तर बच्चे कंपनींनी पावसाचा आनंद लुटला.
 
 
dhany
 
पुढील २४ तासात अमरावती जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट येण्याची व रात्रीचे वातावरण उष्ण राहील, हा अलर्ट मॅसेज जवळपास सर्वांच्या मोबाईलवर इळकला तेव्हाच अमरावतीत काही ठिकाणी हलका तर काही स्थानी मध्यम स्वरूपाचा पाऊस आला. त्यानंतर ढगाळ वातावरण होते.