उन्हाळी शिबिरातून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नव्या संधी

    दिनांक :26-May-2026
Total Views |
- जिल्हाधिकारी डॉ.मंगेश गोंदावले यांचे प्रतिपादन
- विद्यार्थ्यांना एआय ते पारंपारिक कलांचे उन्हाळी शिबिरात प्रशिक्षण

गोंदिया, 
Summer Camp for Tribal Students देवरी येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत देवरी तालुक्यातील बोरबाव /बाजार येथील आश्रम शाळेत उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले असता जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्या अध्यक्षतेत समारोपीय कार्यक्रम पार पडले. यावेळी डॉ. गोंदावले यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अशा शिबिरांमुळे करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले.
 

Tribal Students 
 
Summer Camp for Tribal Students  या शिबिरात विद्यार्थ्यांना महिनाभर विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये गोंडी चित्रकला, मेहंदी, क्ले आर्ट, बॉटल आर्ट, रांगोळी, पेंटिंग, बांबू हस्तकला तसेच एआय आणि रोबोटिक्ससारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय गीत, राज्य गीत आणि गोंडी स्वागत गीताने झाली. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळाल्यास आदिवासी भागातील विद्यार्थीही मुख्य प्रवाहात येऊन देशाच्या विकासात योगदान देऊ शकतात. या शिबिरातून विद्यार्थ्यांना पारंपरिक संस्कृतीसोबत आधुनिक कौशल्ये शिकण्याची संधी मिळाली, ही उल्लेखनीय बाब असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी उमेश काशिद यांनी केले. समारोप सोहळ्यात विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम, सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांना वंदन करणारे नृत्य, स्तवन, भजन, आदिवासी नृत्य तसेच वाद्य सादरीकरण केले. या सादरीकरणांनी उपस्थित पालक भारावून गेले. कार्यक्रमाच्या शेवटी विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.
 
 
एअर शोच्या स्टंटनी वेधले लक्ष ...
कार्यक्रमात विशेष आकर्षण म्हणून एअर शो आयोजित करण्यात आला होता. यामध्ये लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरच्या प्रतिकृतींचे स्टंट सादर करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी मल्लखांबचे कौशल्यपूर्ण सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.