बीड,
Talathi Commits Suicide बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली असून, अवघ्या काही दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकलेल्या एका तरुणाने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अंबाजोगाईच्या मोरेवाडी परिसरात ही घटना घडली असून, गणेश दत्तू कोळी असे मृत तरुणाचे नाव आहे. ते चंद्रपूर महसूल विभागात तलाठी म्हणून कार्यरत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश कोळी यांचा विवाह अवघ्या १२ दिवसांपूर्वीच झाला होता. विवाहानंतर ते पत्नीसोबत अंबाजोगाईतील मोरेवाडी भागात भाड्याच्या खोलीत राहत होते. त्यांच्या पत्नी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील फॉरेन्सिक विभागात कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहेत. घटनेच्या दिवशी त्या नेहमीप्रमाणे ड्युटीसाठी बाहेर गेल्या होत्या. त्याचदरम्यान गणेश यांनी घरातील लोखंडी हुकाला दोरी बांधून गळफास घेतल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. नवविवाहित दाम्पत्याच्या आयुष्यात आनंदाचे क्षण सुरू असतानाच घडलेल्या या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरातही या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात असून, गणेश कोळी यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत.