वर्धा,
Theft at a Jewelry Shop in Wardha शहरातील संवेदनशील मानल्या जाणार्या रामनगर पोलिस ठाणे हद्दीत एकाच रात्री एकाच कॉम्प्लेसमधील तीन दुकाने फोडल्याने खळबळ उडाली. जुनी म्हाडा कॉलनी येथील शॉपिंग कॉम्प्लेसमध्ये ही घटना घडली असून चोरट्यांनी सुमारे ८ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडा कॉलनीतील शॉपिंग कॉम्प्लेसमध्ये संजय उडवंत यांचे आई भवानी ज्वेलर्स, डॉ. पराग शेंडे यांचे गजानन हॉस्पिटल तसेच परीक्षित शेळके यांचे इलेट्रिक व्हेईकल सर्व्हिस व स्पेअर पार्ट्सचे दुकान आहे. मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी लोखंडी शटर वाकवून दुकानांमध्ये प्रवेश केला आणि चोरीचा प्रयत्न केला. डॉ. पराग शेंडे यांनी काही दिवसांपूर्वीच लिनिक सुरू केल्याने तेथे चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. तसेच परीक्षित शेळके यांच्या दुकानातही चोरीचा प्रयत्न फसला. मात्र, संजय उडवंत यांच्या आई भवानी ज्वेलर्समधून चांदीचे दागिने, रोख रकम व इतर साहित्य असा सुमारे ८ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली. माहिती मिळताच रामनगर पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर तसेच रामनगरच्या ठाणेदार पौर्णिमा राखुंडे यांनी घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या. डॉग स्कॉड आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांनीही घटनास्थळी तपास केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरूवात केली असून गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.