मुंबई,
Third Part of the Movie Dharmveer 'धर्मवीर' या गाजलेल्या चित्रपटाच्या दोन्ही भागांना मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता तिसऱ्या भागाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. निर्माता मंगेश देसाईयांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या बहुचर्चित चित्रपटाबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. विशेष म्हणजे, ‘धर्मवीर 3’ हे नाव कायम राहणार नसून चित्रपटाचे शीर्षक बदलण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.एका मुलाखतीदरम्यान मंगेश देसाई यांनी सांगितले की, या चित्रपटाची कथा पूर्ण झाली असून वर्षाअखेरीस चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच हा चित्रपट 2027 साली प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे करणार असल्याचेही समोर आले आहे.

चित्रपटाच्या नावाबाबत बोलताना मंगेश देसाई म्हणाले की, नव्या शीर्षकाची नोंदणी करण्यात आली आहे. मात्र अंतिम नावावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यांनी सांगितले की, प्रेक्षकांना या चित्रपटात यापूर्वी कधीही न पाहिलेला अनुभव मिळणार आहे. कथानकात मोठे ट्विस्ट, वास्तववादी घटना आणि वेगळ्या पद्धतीचे सादरीकरण पाहायला मिळेल, असा दावाही त्यांनी केला.‘धर्मवीर’च्या पुढील भागाबाबत प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच मोठी उत्सुकता आहे. हा चित्रपट फक्त सिक्वेल नसेल, तर एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव असेल, असेही मंगेश देसाई यांनी नमूद केले. त्यामुळे आता या नव्या शीर्षकाची आणि चित्रपटाच्या कथानकाची उत्सुकता आणखी वाढली आहे. ‘धर्मवीर’ मालिकेच्या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले होते. त्यामुळे आता तिसऱ्या भागाकडूनही प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या असून, 2027 मध्ये हा सिनेमा मोठ्या पडद्यावर काय धमाका करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.