दोघांचा मृत्यू, एक जखमी
अमरावती,
Tipper-Two-wheeler Accident भरधाव टिपरने दुचाकीस्वार तिघांना चिरडल्याने दोघांचा मृत्यू झाला तर एक जखमी झाला आहे. ही घटना गाडगे नगर पोलिस ठाणे हद्दीतील आराधना चौकातील कठोरा नाक्याजवळ मध्यरात्री घडली. मृतक दोन्ही युवकांवर विविध गुन्हे दाखल होते. माहितीनुसार, महेंद्र कॉलनीचा रहिवासी तेजस उर्फ गोल्या माथुरकर व यश कनुजिया सोमवारी रात्री सुमारे साडेबारा वाजता आणखी एक साथीदाराल घेऊन आराधना चौकातून एमएच- २७/बी- ५७५८ क्रमांकाच्या दुचाकीवरून जात होते.
(संग्रहित छायाचित्र)
Tipper-Two-wheeler Accident त्याचवेळी एमएच २७/ बीएक्स -८६८३ क्रमांकाच्या टिपर चालकाने भरधाव वेगात दुचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की तेजस, यश आणि त्यांचा साथीदार गंभीर जखमी झाले. घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली. घटनेची माहिती मिळताच, गाडगे नगर पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. तिन्ही जखमींना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी तेजस आणि यश यांना मृत घोषित केले. त्यांच्या एका साथीदारावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर टिपर चालक वाहनासह फरार झाला. तेजस आणि यश यांच्या मृत्यूची बातमी कळताच, मोठ्या संख्येने स्थानिक रहिवाशांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. मंगळवार, २६ मे रोजी, कडेकोट पोलिस बंदोबस्तात दोन्ही मृत तरुणांचे शवविच्छेदन करण्यात आले आणि त्यांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. गाडगे नगर पोलिसांनी आरोपी टिपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.