वेध
चंद्रकांत लोहाणा
Uddhav Thackeray केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ भोगावेच लागते, हा निसर्गाचा अलिखित नियम आहे. वाट्याला येणारा हा भोग कधी चेहऱ्यावर हास्य फुलवितो तर कधी डोळ्यांमधून अश्रूच्या धाराही गाळतो. अशीच काहीशी परिस्थिती सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची झाली आहे. भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून केलेल्या विश्वासघाताची फळे आता उबाठाला चाखायला मिळत आहेत. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईने या पक्षाला काही काळापुरते तारले असले तरी शेवटी धुरा सांभाळणारा चालक निष्णात असावा लागतो. संघटन आणि कार्यकर्ता घडविण्यासाठी रक्ताचे पाणी करून जमिनीवर उतरावे लागते. चार भिंतीच्या आड स्वत:ला कोंडून राजकारण करण्याचे ते दिवस आता गेले. सामान्य जनतेची नस न ओळखल्याने काँग्रेसची जी गत झाली, तीच स्थिती आता उबाठाची होऊ लागली आहे. नेमक्या याच कमतरतेमुळे उबाठाला घरघर लागली. पक्ष फुटला, चाळीस आमदारांना आपल्या सोबत घेत एकनाथ शिंदे यांनी मूळ शिवसेना पक्ष आपल्या ताब्यात घेतला. तेव्हापासून पक्षाला लागलेली गळती, अंतर्गत कलह आणि नेतृत्वाच्या अभावामुळे हा पक्ष कायमचा रसातळाला जाईल की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
एकेकाळी राज्याच्या सत्ताकेंद्रामध्ये सत्ता उपभोगत रिमोट कंट्रोल आपल्या हाती ठेवणारे पक्षप्रमुख Uddhav Thackeray उद्धव ठाकरे राज्याच्या राजकारणातूनच बाहेर फेकले गेले आहेत की काय असे वाटते. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये त्या पक्षाचे फक्त 20 आमदार निवडून आले. स्व. बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्याना कधीच सत्तेचा मोह झाला नाही. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची धुरा कार्यकर्त्यांना देऊन एक वेगळा पायंडा पाडला आणि स्वतः हिंदुत्वाची मशाल कायम धगधगत ठेवून शिवसेनेला राज्यामध्ये घराघरात पोहोचविण्याचे कार्य केले. मात्र, बाळासाहेबांचे समर्पण, त्याग आणि हिंदुत्वाला तिलांजली देत उद्धव ठाकरे यांनी त्यास कायमची सोडचिठ्ठी दिली. रोज भाजपला शिव्या घालून मतदारांच्या मनामध्ये पक्षप्रेम रुजविता येत नाही, हे सांगण्यासाठीही आज उद्धव ठाकरे यांच्याकडे माणसे शिल्लक नाहीत. हाती सत्ता नसली की, पक्ष बेफाम होतो तीच अवस्था सध्या उबाठाची झाली आहे. उबाठाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते दुसèया पक्षाचा झेंडा आपल्या हाती घेताना दिसून येत आहे. वाशीममध्ये दिवसरात्र एक करून सुरेश मापारी यांनी उबाठाला जिल्ह्यामध्ये जिवंत ठेवले होते. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही श्रेय मिळत नसल्याचे बघून मापारी यांनी आपल्या शेकडो समर्थकासह भाजपला जवळ केले. मराठवाडा आणि कोकणातही उबाठामध्ये अंतर्गत नाराजीने कळस गाठला असून, ती कधी उफाळून येईल याचा नेम नाही. सलग पाचवेळा खासदार म्हणून निवडून येणाèया भावना गवळी यांनाही जो पक्ष सांभाळू शकला नाही, त्या पक्षाच्या भविष्याबद्दल काय बोलावे? ज्यावेळी शरद पवारांनी सापळा रचून उद्धव ठाकरे यांना आपल्या जाळ्यात ओढले त्याचवेळी उद्धव ठाकरे यांचे भविष्य ठरले होते. सत्तेच्या मोहापायी मूळ विचारांना तिलांजली देणे हे राज्यामधील जनतेच्या पचनी पडले नाही. त्यानंतर कार्यकर्त्यांची उपेक्षा आणि गटबाजीने उबाठा त्रस्त झाली. एखादा प्रादेशिक पक्ष म्हटला की, त्यास बèयाच मर्यादाही असतात. राज्यातील जनतेच्या आकांक्षाना खरे उतरले तरच प्रादेशिक पक्षांना पाय पसरायला संधी मिळते.
बाळासाहेब ठाकरेंनंतर Uddhav Thackeray उद्धव ठाकरे कोणत्याच कसोटीवर खरे उतरले नाही. त्यामुळे युती तोडणे हे त्यांच्यासाठी आत्मघातकी पाऊल ठरले. आपल्या क्षमतांची मर्यादा ओळखून जर वाट चोखाळली असती तर आज राज्यामध्ये वेगळे चित्र बघायला मिळाले असते. अथक परिश्रम, विचाराची स्पष्टता आणि आपल्या ध्येयधोरणांशी निष्ठा असल्याने भाजपने जवळपास अख्खा देश पादाक्रांत केला आहे. पश्चिम बंगाल हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. त्यामुळे आज राजकारणी भाजप प्रवेशासाठी रांगेत उभे आहेत. काही वर्षांपूर्वी आपले फक्त दोनच खासदार निवडून आले म्हणून भाजपने हार न मानता मार्गक्रमण सुरू ठेवले. आपल्या ध्येयधोरणांमध्ये असलेली नैतिकता ही भाजपची आयुष्यभराची शिदोरी आहे. त्यामुळेच जनतेच्या कसोटीवरही हा पक्ष खरा उतरला आहे, हे उबाठाला ज्यावेळी कळेल तोवर कदाचित वेळ निघून गेलेली असेल.
9881717856