वणी,
Vivekananda Vidyalaya: Alumni Reunion विवेकानंद विद्यालय येथील 2005-06 च्या इयत्ता 10 वी (अ) बॅचच्या विद्यार्थ्यांचा तब्बल 20 वर्षांनंतर आयोजित करण्यात आलेला स्नेहमिलन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, आनंददायी आणि भावनिक वातावरणात पार पडला. जुन्या मित्र-मैत्रिणी, गुरुजन आणि शालेय जीवनातील आठवणींना उजाळा मिळाल्याने उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक दिलीप आस्कर होते. प्रमुख अतिथी म्हणून स्नेहलता चुंबळे, सुनील बेसकर, राजेंद्र खोंडे, संतोष बेलेकर, देवानंद गेडाम, गजानन राठोड, जयंत मेश्राम आणि पुरुषोत्तम पिटलावार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षकांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.
Vivekananda Vidyalaya: Alumni Reunion कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांनी बालपणीच्या आठवणी ताज्या करत जुन्या काळातील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. बोरकुटच्या गोळ्या, आलू नरडे, लिमलेट गोळ्या, बोरं, आईस गोळा, चकली आणि चॉकलेटचा आस्वाद घेत उपस्थितांनी शालेय दिवस पुन्हा अनुभवले. यावेळी वर्ग शिक्षक मानकर आणि काकडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रा. रोहित वनकर यांनी आपल्या बासरीच्या मधुर सुरांनी उपस्थितांची मने जिंकली. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःचा परिचय करून देत शालेय आठवणींना उजाळा दिला. सुप्रिया केदार यांनी सादर केलेल्या सुरेल गीतामुळे कार्यक्रम अधिक भावनिक आणि संस्मरणीय ठरला. विविध मनोरंजनात्मक खेळांनी कार्यक्रमात आनंदाची भर घातली. कार्यक्रमाचे संचालन सुप्रिया केदार यांनी केले. प्रस्तावना स्वप्नील आत्राम यांनी केली. आभारप्रदर्शन आशिष डंभारे यांनी केले. या कार्यक्रमासाठी पंकज कासावार, अमरिश मिलमिले, महेश वराटे, मिथुन विधाते, सुजाता पेटकर, स्नेहल इनामे, गणेश अभंग, शिशिर हेपट, अभि पद्मलमवार, शरद हेपट आणि सलीम हुसेन यांनी परिश्रम घेतले.