वणी,
Wani Accident Case अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचा हरवलेला महागडा मोबाईल शोधून तो त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप सुपूर्द करून वणी पोलिसांनी संवेदनशीलता आणि तांत्रिक कौशल्याचे आदर्श उदाहरण दिले आहे. सायबर सेल आणि केंद्र सरकारच्या पोर्टलच्या मदतीने हा मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले. काही दिवसांपूर्वी वणी येथील जन्नत हॉटेल परिसरात भीषण कार अपघात झाला होता. या अपघातात भीमनगर येथील मॅकेनिक रियाजुद्दीन शेख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अपघातानंतरच्या गोंधळात त्यांच्याजवळील मोबाईल फोन हरवला होता. मृत व्यक्तीचे भाऊ शाकीरउद्दीन यांनी वणी पोलिस ठाण्यात मोबाईल हरवल्याची तक्रार केली होती.
Wani Accident Case तक्रारीनंतर वणी पोलिस ठाण्याच्या पोर्टल हँडलर छाया उमरे यांनी तत्काळ तांत्रिक तपास सुरू केला. हरवलेल्या मोबाईलची माहिती पोर्टलवरही नोंदण्यात आली. काही दिवसांनी हाच मोबाईल सक्रिय होताच पोर्टलवरून त्याचा मागोवा लागला. पोलिसांनी मोबाईलचे अचूक लोकेशन शोधून तो जप्त करण्यात यश मिळवले. सोमवार, 25 मे रोजी ठाणेदारांच्या मार्गदर्शनात शाकीरउद्दीन यांना पोलिस ठाण्यात बोलावून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि त्यांचा मोबाईल त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. दिवंगत भावाची शेवटची आठवण आणि त्यातील वैयक्तिक माहिती सुरक्षित परत मिळाल्याने भावुक झालेल्या शाकीरउद्दीन यांनी वणी पोलिस प्रशासन आणि अंमलदार छाया उमरे यांचे आभार मानले.