बंगळूरू
A New Equation in Karnataka कर्नाटकातील मुख्यमंत्रीपदाभोवती सुरू असलेले राजकीय नाट्य अद्याप थांबलेले नाही. राज्यात नेतृत्वबदलाच्या चर्चांना वेग आला असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या लवकरच राजीनामा देऊ शकतात, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर २८ मे रोजी होणारी ‘नाश्त्याची बैठक’ अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कावेरी निवासस्थानी उपस्थित राहणार आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये होणारी ही बैठक केवळ औपचारिक नसून, राज्यातील सत्तासमीकरण आणि नेतृत्वबदलाबाबत महत्त्वाचे निर्णय याच बैठकीत घेतले जाऊ शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी अलीकडेच सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करताना पक्षात त्यांच्या भूमिकेला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, राज्यातील पुढील निवडणुकांच्या दृष्टीने काँग्रेसला नवे नेतृत्व देण्याची गरज असल्याचेही संकेत दिले गेले आहेत. यामुळे नेतृत्वबदलाच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.दरम्यान, दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली होती. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री शिवकुमार, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि इतर वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते.
२०२३ च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपद वाटपाबाबत ‘अडीच-अडीच वर्षे’ फॉर्म्युल्याची चर्चा सातत्याने होत आहे. त्यानुसार शिवकुमार समर्थकांकडून मुख्यमंत्रीपदाची मागणी होत असली तरी सिद्धरामय्या यांनी मात्र आपला कार्यकाळ पूर्ण करण्याची भूमिका घेतली आहे. या सर्व घडामोडींमुळे कर्नाटकातील राजकारणात मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, २८ मे रोजी होणारी बैठक राज्याच्या राजकीय भविष्यासाठी निर्णायक ठरू शकते.