दारव्हा,
Sanjay Rathod मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या, तक्रारी आणि विविध मागण्यांचे तातडीने निराकरण व्हावे यासाठी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या पुढाकारातून ‘आपली हाक : माझी साथ’ हा नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे दारव्हा, दिग्रस, नेर आणि यवतमाळ येथील नागरिकांना त्यांच्या समस्या थेट संपर्क कार्यालयांमार्फत मांडण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत त्वरित कार्यवाही करण्याची यंत्रणा उभारण्यात आली असून, प्रत्येक निवेदनाची संगणकीय नोंद करून त्याला स्वतंत्र क्रमांक देण्यात येणार आहे. यानंतर संबंधित समस्या तालुकास्तरावरून पुढे नेऊन जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यावर कार्यवाही केली जाणार आहे. गरज भासल्यास संयुक्त बैठकीद्वारे तक्रारींचे निराकरण करण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
मागील 22 वर्षांपासून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून जनतेच्या विश्वासामुळे विकासकामांना गती मिळाली असल्याचे संजय राठोड यांनी नमूद केले. मंत्रीपदासोबतच पालकमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडताना प्रत्येक नागरिकाच्या समस्या जाणून घेणे हे आपले कर्तव्य असल्याची भूमिकाही त्यांनी व्यक्त केली आहे.
या उपक्रमांतर्गत दारव्हा, दिग्रस, नेर आणि यवतमाळ येथे संपर्क कार्यालये सुरू करण्यात आली असून सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत नागरिकांना आपली निवेदने व तक्रारी नोंदवता येणार आहेत. या उपक्रमामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यात थेट संवाद प्रस्थापित होऊन समस्यांचे निराकरण अधिक वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.