मुंबई
MD drugs lab मुंबईतील दक्षिण मुंबई परिसरात अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत आग्रीपाडा येथील ‘यास्मीन टॉवर’ या २३ मजली रहिवासी इमारतीतील १०व्या मजल्यावर सुरू असलेली एमडी ड्रग्ज तयार करण्याची अवैध प्रयोगशाळा उद्ध्वस्त केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एका बांगलादेशी महिलेसह तिघांना अटक केली असून सुमारे ५१ कोटी रुपयांचा कच्चा माल, तयार एमडी ड्रग्ज तसेच पिस्तूल आणि १९ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शोएब मन्सुरी (वय ३१), सुफियान मन्सुरी (वय २८) आणि मामुनी सरकार (वय २७) यांचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या तिघांनी रहिवासी इमारतीतील फ्लॅट भाड्याने घेऊन त्यामध्ये स्वयंपाकघराचा वापर करून ड्रग्ज निर्मितीसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा उभारली होती. या फ्लॅटसाठी दरमहा सुमारे ४५ हजार रुपये भाडे दिले जात असल्याचे समोर आले आहे।
कांदिवली युनिटचे MD drugs lab वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत जगदाळे आणि सहायक निरीक्षक उल्हास खोलम यांच्या पथकाला या ठिकाणी एमडी ड्रग्ज तयार केले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर केलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात रसायने, ड्रग्ज निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य तसेच इतर संबंधित वस्तू आढळून आल्या.पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आरोपींनी ड्रग्ज निर्मिती करताना उग्र वास बाहेर जाऊ नये म्हणून फ्लॅटमध्ये सतत एसी सुरू ठेवला होता. तसेच वास लपवण्यासाठी धूप आणि कापूर यांचा धूरही केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. ही संपूर्ण व्यवस्था रहिवासी इमारतीत गुप्तपणे चालवली जात होती.
या प्रकरणातील MD drugs lab मुख्य आरोपी शोएब मन्सुरी याच्यावर यापूर्वी सोनसाखळी चोरी, जबरी चोरी यांसह तब्बल २१ गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ड्रग्ज व्यवसायात आपला दबदबा निर्माण करण्यासाठी आरोपींनी पिस्तूल आणि काडतुसे बाळगल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. हे शस्त्र आणि काडतुसे नेमकी कुठून आणली याचा तपास सध्या सुरू आहे.या कारवाईनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून रहिवासी इमारतीत इतक्या मोठ्या प्रमाणावर अवैध प्रयोगशाळा चालवली जात असल्याने पोलिस यंत्रणेसमोरही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पुढील तपास अमली पदार्थ विरोधी पथकाकडून सुरू आहे.