अहिल्यानगर
Akole taluka अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातून बालहक्कांचे गंभीर उल्लंघन समोर आले असून तब्बल ५५ अल्पवयीन मुली गरोदर असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, यापैकी बहुतांश मुलींचा बालविवाह झाल्याचे स्पष्ट झाले असून काही मुलींनी प्रसूतीही केली असल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्र शासनच्या महिला व बालविकास विभागाकडून अकोले तालुक्यात करण्यात आलेल्या अलीकडील सर्वेक्षणात ही गंभीर बाब उघडकीस आली. अकोले आणि राजूर प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविकांकडून दरमहा गर्भवती व स्तनदा मातांचे नियमित सर्वेक्षण केले जाते. याच प्रक्रियेदरम्यान या धक्कादायक आकडेवारीचा उलगडा झाला. या ५५ अल्पवयीन मुलींपैकी ५४ मुलींचे बालविवाह झाल्याचे समोर आले आहे, तर एक मुलगी अविवाहित असूनही गर्भवती असल्याची माहिती मिळाली आहे. काही मुलींच्या प्रसूती झाल्याचेही स्पष्ट झाल्याने प्रशासनासह बालहक्क यंत्रणांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारच्या ‘मातृत्व वंदना योजने’अंतर्गत आलेल्या अर्जांमध्येही या अल्पवयीन मुलींची नावे आढळल्याने संपूर्ण प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.
या प्रकारामुळे बालविवाह Akole taluka आणि अल्पवयीन मातृत्वाचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले असून सामाजिक दबाव, अज्ञान आणि कायदेशीर कारवाईच्या भीतीमुळे अनेक बालविवाह नोंदवलेच जात नाहीत, असे निरीक्षण नोंदवले जात आहे. काही पालक मुली पळून जाऊन लग्न करतील या भीतीने अल्पवयातच विवाह लावून देतात, त्यामुळे प्रत्यक्षातील संख्या यापेक्षा अधिक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून राज्य बालहक्क आयोगाकडे चौकशीची मागणी करण्यात आली आहे. बालविवाह रोखण्यासाठी ग्रामस्तरीय बाल संरक्षण समित्या अधिक सक्रिय करणे, विवाहावेळी जन्म प्रमाणपत्रांची सक्ती करणे तसेच अल्पवयीन विवाहांमध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर फौजदारी कारवाई करण्याची मागणी स्थानिक बालसंरक्षण समितीच्या सदस्यांनी केली आहे.या घटनेनंतर अकोले तालुक्यातील सामाजिक परिस्थिती, बालसंरक्षण यंत्रणा आणि अंमलबजावणी यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून पुढील चौकशीतून अधिक तपशील समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.