इंधन संकटाचा आकाशात स्फोट!।

एअर इंडिया-इंडिगोची उड्डाण कपात

    दिनांक :27-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Air India, IndiGo Cut Flights मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचे पडसाद आता भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रावर उमटू लागले आहेत. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या विक्रमी वाढीमुळे विमान इंधन महागले आहे .  तर देशातील प्रमुख विमान कंपन्यांनी उड्डाणांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.देशातील दोन प्रमुख विमान कंपन्या एअर इंडिया आणि इंडिगो यांनी १ जून २०२६ पासून देशांतर्गत उड्डाणांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात पुढील ९० दिवसांसाठी लागू राहणार असल्याचे सांगितले जात आहे. वाढत्या इंधन खर्चामुळे विमान कंपन्यांवर आर्थिक दबाव वाढला असून, त्यातूनच हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
 
 

a2443 
 
दिल्ली आणि मुंबई विमानतळांना जास्ट फटका
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडिया आपल्या देशांतर्गत उड्डाणांमध्ये सुमारे १५ टक्क्यांपर्यंत कपात करू शकते. सध्या कंपनी दर आठवड्याला हजारो उड्डाणे चालवत असून, त्यात मोठी घट होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे इंडिगोनेही ५ ते ७ टक्के उड्डाणे कमी करण्याची तयारी सुरू केली आहे. देशातील विमान वाहतूक बाजारपेठेवर या दोन कंपन्यांचे वर्चस्व असल्याने या निर्णयाचा परिणाम लाखो प्रवाशांवर होणार आहे.विशेष म्हणजे कोणताही मार्ग पूर्णपणे बंद करण्यात येणार नसला, तरी अनेक महत्त्वाच्या शहरांदरम्यानच्या उड्डाणांची संख्या कमी होणार आहे. दिल्ली, मुंबई, बंगळूर, हैदराबाद, कोलकाता, अहमदाबाद, नागपूर, पाटणा आणि भोपाळ यांसारख्या प्रमुख शहरांवरील विमानसेवांवर त्याचा परिणाम जाणवणार आहे. विशेषतः दिल्ली आणि मुंबई विमानतळांवरून होणाऱ्या उड्डाणांना सर्वाधिक फटका बसणार असल्याचे सांगितले जात आहे.
 
विमान कंपन्यांनी संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी १ जून ते ३१ ऑगस्टदरम्यान कमी करण्यात येणारी उड्डाणे आधीच त्यांच्या बुकिंग प्रणालीमधून हटवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रवाशांना शेवटच्या क्षणी अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान, विमान वाहतूक तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, जर जागतिक बाजारात इंधनाच्या किमती कमी झाल्या नाहीत, तर येत्या काळात विमान तिकिटांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. त्यामुळे सामान्य प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.