अकोला,
Akola's Flag in Warsaw Poland अकोल्याच्या १७ वर्षीय सार्थक ढोले यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत भारताची मान उंचावली आहे. पोलंडची राजधानी वॉर्सा येथे पार पडलेल्या ३४ व्या आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान ऑलिंपियाडमध्ये सार्थक यांनी कांस्यपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. विशेष म्हणजे २०१९ नंतर प्रथमच भारताला या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पदक मिळाले आहे.जगभरातील ५७ देशांतील १२४ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. तत्त्वज्ञान विषयावरील सखोल अभ्यास, विचारशक्ती आणि प्रभावी लेखनाच्या जोरावर सार्थक यांनी परीक्षकांची मने जिंकली. ‘स्वातंत्र्य आणि तर्क’ या विषयावर लिहिलेल्या त्यांच्या निबंधाला विशेष दाद मिळाली.
सार्थक यापूर्वीही अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताचे प्रतिनिधित्व करत आले आहेत. फिनलंड, इटली आणि हंगेरी येथे झालेल्या विविध स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवत आपल्या गुणवत्तेची छाप पाडली होती. आता पोलंडमधील या यशामुळे त्यांच्या नावाची चर्चा देशभर होत आहे. अकोल्यासारख्या शहरातून जागतिक स्तरावर पोहोचलेल्या सार्थक यांच्या या यशामुळे महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण आहे. विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कामगिरीमुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत आहे.