देवळीत डीएपीचा कृत्रिम तुटवडा; खतांसोबत इतर साहित्य खरेदीची सक्ती

*कृषी विभागाकडे तक्रार

    दिनांक :27-May-2026
Total Views |
देवळी, 
dap in deoli खरीप हंगामाच्या पृष्ठभूमीवर डीएपी खताच्या उपलब्धतेबाबत देवळी तालुक्यात शेतकर्‍यांमध्ये नाराजी वाढत आहे. खताचा कृत्रिम तुटवडा व काळाबाजार होत असल्याची तक्रार शेतकरी विनोद कामडी यांनी कृषी अधिकार्‍यांकडे केली आहे. कामडी यांनी डीएपी खतासाठी शहरातील तीन दुकानदारांकडे वारंवार फेर्‍या मारत असताना काही ठिकाणी आवश्यक प्रमाणात खत उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असून शेतकर्‍याला डीएपी खतासोबत इतर खतं किंवा साहित्य घेण्याची सती करण्यात येत होती. कृषी विभागाने तातडीने कृषी केंद्र चालकांच्या गोदामाची तपासणी करून दोषींवर कारवाई करावी तसेच शेतकर्‍यांना योग्य दरात व पुरेशा प्रमाणात डीएपी खत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
 

dap in deoli 
 
 
राज्य शासनाने शेतकर्‍यांना शासकीय दराने कृषी केंद्रातून डीएपी खत उपलब्ध करून दिले आहे. डीएपी खत उपलब्ध असून सुद्धा सोबत इतर खते, बियाणे, औषधे घेण्याची सक्ती करण्यात येत आहे. अनेक शेतकर्‍यांनी यापूर्वीही तक्रारी केल्या. परंतु, कृषी विभागाने थातूरमातूर चौकशी करून शेतकर्‍यांचे समाधान केले. शेतकरी कामडी यांनी त्यांच्यासोबत घडलेला प्रकाराची तालुका कृषी अधिकार्‍यांना लेखी तक्रार दिली. कृषी सेवा केंद्र संचालकाच्या गोडावूनची तपासणी करून डीएपी खत आढळल्यास त्या कृषी केंद्र चालकावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, कृषी अधिकार्‍यांनी बघतो, करतो, चिंता करू नका, तुम्हाला खताची व्यवस्था करून दिल्या जाईल, असे सांगीतले. परंतु, कामडी यांनी तुम्ही कृषी केंद्राची पाठराखाण का करीत आहे, मला त्याच दुकानातून डीएपी खत पाहिजे, यावर ते ठाम राहिले. तालुका कृषी अधिकार्‍यांनी दोन दिवसानंतर त्या कृषी केंद्राला नोटीस बजावली. पुढे त्या नोटीसीवर काय कारवाई झाली, हे अजूनही कळले नाही. शेतकर्‍यांची लूट करणार्‍या देवळी शहरातील कृषी केंद्राची शासनाने चौकशी करून त्वरित कारवाई करावी, तसेच कृषी केंद्र संचालकांची पाठराखण करणार्‍या अधिकार्‍यांची सुद्धा चौकशी करण्याची मागणी होत आहे.
देवळी शहरातील तीन कृषी सेवा केंद्रावर डीएपी खताचा साठा उपलब्ध असून सुद्धा शेतकर्‍यांना डीएपी न देता त्याच्यासोबत अन्य खत औषध बियाणे यांच्या मनमर्जीप्रमाणे घेतले तर ते डीएपी खत देतात नाही तर आमच्याकडे नाही असे सांगून मोकळे होतात. आपण कृषी अधिकारी युवराज जंगले यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारातून आवक कमी आहे असे सांगून आपल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. खतांचा काळाबाजार करणार्‍यांवर लगाम लावावी, अशी मागणी शेतकरी विनोद कामडी यांनी केली.
आपल्याला शेतकरी विनोद कामडी यांची तक्रार प्राप्त झाली आहे. त्या कृषी केंद्राला आम्ही नोटीस सुद्धा बजावली आहे. भविष्यात कृषी केंद्र धारकांनी मनमर्जी कारभार केला तर आम्ही कठोर कारवाई करू. परंतु, खताचा तुटवडा हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा मुद्दा आहे आणि साहजिकच शेतकर्‍यांना खताची झळ पोहोचणारच आहे, अशी प्रतिक्रीया पंसचे कृषी अधिकारी युवराज जंगले यांनी दिली.